आगामी शैक्षणिक वर्षांपासून देशात पाच नव्या ‘भारतीय तंत्रज्ञान संस्था’ (आयआयटी) सुरू करण्यात येणार आहेत, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात या आयआयटीचा प्रस्ताव ठेवला होता.
जम्मू-काश्मीर, छत्तीसगढ, गोवा, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये या आयआयटी सुरू करण्यात येणार आहेत. देशात पाच नव्या ‘भारतीय व्यवस्थापन संस्था’ (आयआयएम) सुरू करण्याचाही प्रस्ताव आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या राज्यांच्या सरकारांना पत्र पाठवून या संस्थांची उभारणी करण्यासाठी जागा शोधण्याची सूचना केली आहे. या जागी पाहणी करण्यात येईल आणि आगामी वर्षांपासून त्या तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात येतील, असे मंत्रालयाने कळविले आहे. या आयआयटी सुरू झाल्यानंतर देशातील एकूण ‘आयआयटी’ची संख्या २१ होईल.
प्रत्येक आयआयटीसाठी सुमारे १८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सध्या सुरू असलेल्या १६ आयआयटीमध्ये बी.टेक.च्या १०,००० जागा आहेत. पुढील वर्षी त्यांची संख्या १०,५०० होईल.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 29, 2014 12:14 pm