भारतीय वायुदलाच्या पुनरावलोकन अहवालातील माहिती; काही त्रुटींवरही प्रकाश 

 नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद प्रशिक्षण शिबिरावर २६ फेब्रुवारीला करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात या परिसरातील  सहा इमारतींपैकी पाच लक्ष्ये टिपण्यात भारतीय वायुदलाच्या विमानांना यश आले होते, असे वायुदलाने या हल्ल्यांबाबत केलेल्या पुनरावलोकनात (रिव्ह्य़ू) दिसून आले आहे.

या सविस्तर पुनरावलोकनात या हवाई मोहिमेची बलस्थाने, कमकुवत बाबी आणि त्यातून शिकलेले धडे यांच्यावर झोत टाकण्यात आला असल्याचे या प्रक्रियेशी संबंधित दोन सूत्रांनी सांगितले.

लक्ष्याचा नेमका वेध घेण्यासाठी अधिक चांगली शस्त्रे हाताशी असायला हवी होती.  त्यातून प्रचारयुद्धातही वरचष्मा राखता आला असता, हे या समीक्षेत मान्य करण्यात आले आहे. याचवेळी, धक्कातंत्र कायम राखणे, मोहिमेची सुरक्षितता, वैमानिकांची कुशलता आणि वापरलेल्या शस्त्रांची अचूकता याबद्दलच्या सकारातामक बाजूंचाही त्यात ठळकपणे उल्लेख करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत सहा इस्रायली स्पाइस २००० पेन्रिटेटर टाइप पीजीएमचा (प्रिसिजन- गायडेड म्युनिशन) लक्ष्यांना भेदण्यासाठी वापर करण्याचे नियोजन होते आणि त्यापैकी पाच बालाकोट परिसरातील इमारतींवरील ‘मीन पॉइंट ऑफ इम्पॅक्ट’वर जाऊन आदळले. एक पीजीएम मिराज २००० विमानातून बाहेर पडले नाही, कारण ३५ वर्षे जुन्या असलेल्या या विमानाच्या इनर्शिअल नॅव्हिगेशन सिस्टिमची गती अनियमित झाली होती. याचा अर्थ, पीजीएम फेकले जाण्याच्या टप्प्यावर पीजीएम आणि विमानाने पाहिलेल्या ठिकाणात (लोकेशन) ताळमेळ राहिला नाही आणि त्यामुळे पीजीएमचा विमानातून मारा केला जाऊ शकला नाही.