जीडीपी चा पहिल्या तिमाहीतला दर हा पाच टक्क्यांवर जाणं हा माझ्यासाठी धक्कादायकच होतं असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. “जीडीपी दर 5.5 टक्क्यांच्या खाली जाणार नाही असा अंदाज होता. मात्र समोर आलेली टक्केवारी पाहून मला धक्का बसला” असं शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. देशाचा आर्थिक विकास दर सुधारण्यासाठी सरकारने काही निर्णय घेतले आहेत, असंही त्यांनी सांगितलं. ” विदेशी गुंतवणुकीचा दर मागच्या वर्षीच्या तुलनेत चांगला आहे, तसंच खाद्यपदार्थांची महागाई येत्या काही दिवसांमध्ये कमी होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.”

2020 च्या आर्थिक वर्षात जीडीपीचा दर 6.9 टक्क्यांवर नेण्याचं उद्दीष्ट आहे. जीडीपीचे आत्ता समोर आलेले आकडे नक्कीच वर्तवलेल्या अंदाजाच्या तुलनेत कमी आहेत. त्यामुळेच जीडीपी दर वाढवण्यासा आरबीआयनं प्राधान्य दिलं आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये व्याजदर कमी होतील का? असा प्रश्न त्यांना विचारला असता, ” याबाबत तूर्तास काही भाष्य करता येणार नाही असं दास यांनी म्हटलं आहे. सध्या जीडीपीचा दर ही मात्र चिंतेची बाब आहे. फक्त मीच नाही तर प्रत्येकानेच जीडीपी दर 5.8 टक्के किंवा 5.9 टक्के येईल असा अंदाज वर्तवला होता. इतकंच काय जीडीपीचा दर घसरला तरीही तो 5.5 टक्क्यांपेक्षा खाली जाणार नाही असं वाटत होतं. मात्र 5 टक्के जीडीपी दर ही धक्कादायक बाब होती” असंही दास यांनी म्हटलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“डाळी आणि भाजीपाला यांच्या किंमती ज्या असणं अपेक्षित होतं तशाच आहेत. काही उत्पादनांच्या वाढलेल्या किंमती या ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासासाठी चांगल्या आहेत. तसंच दूध आणि अंडी यांच्या किंमतीत शहरांमध्ये वाढ झाली आहे असंही निरीक्षण त्यांनी नोंदवलं. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने सरकारी तिजोरीवर ताण येणार आहे. सौदी अरामको येथील कंपनीच्या तेलसाठ्यावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा परिणाम पूर्ण जगावरच होणार आहे. भारतावर याचा नेमका कसा परिणाम होतो? ते समजण्यासाठी थोडासा कालावाधी जावा लागेल” असंही दास यांनी म्हटलं आहे.