हिंदू समाज पक्षाचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या खुनाच्या संबंधात पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून, त्यापैकी तिघांना गुजरातमध्ये पकडण्यात आले आहे.

तिवारी यांची पत्नी किरण यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत ज्यांची नावे नमूद केली होती, त्या बिजनोर येथील मोहम्मद मुफ्ती नईम काझमी आणि इमाम मौलाना अन्वरुल हक या दोघांविरुद्ध शुक्रवारी खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

या दोघांनीही तिवारी यांना ठार करणाऱ्यास दीड कोटींचे रोख बक्षीस देण्याची घोषणा २०१६ मध्ये केली होती, असे किरण यांनी म्हटले होते. ‘त्यांनी कट रचून माझ्या पतीला ठार मारले’, असा आरोप त्यांनी केला होता.

फैझन युनुस भाई, मौलाना मोहसीन शेख आणि रशीद अहमद खुर्शीद अहमद पठाण या तिघांना गुजरातच्या सूरत शहरातून अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश आणि गुजरातचे पोलीस त्यांची चौकशी करत आहेत, मात्र या घटनेशी दहशतवादाचा संबंध असल्याचे आतापर्यंत आढळलेले नाही, असे उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक ओ.पी. सिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

सूरतमध्ये तिघांना कशी अटक करण्यात आली, याचा तपशील पोलीस महासंचालकांनी दिला. त्यानुसार, गुन्ह्य़ाच्या ठिकाणी सापडलेल्या मिठाईच्या डब्याच्या आधारे गुजरात पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आणि एक पथक तेथे पाठवण्यात आले. सूरतमधील एका मिठाईच्या दुकानातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येऊन फैझान युनुस भाई याला ओळखण्यात आले. त्यानंतर इतर दोघांना ताब्यात घेण्यात आले.