छत्तीसगड राज्यातील दांतेवाडा जिल्ह्य़ात सुरुंगरोधक वाहन नक्षलवाद्यांनी सुरूंगाचा स्फोट करून उडवून दिल्याच्या घटनेत सुरक्षा दलाचे चार जवान सोमवारी शहीद झाले. त्यात सातजण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. नक्षलवाद्यांनी शनिवारपासून केलेला हा चौथा हल्ला आहे.
हा स्फोट चोलनार व किरनदुल रस्त्यावर झाला असून दुपारच्या वेळेस रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी जवान गस्त घालीत असताना हा स्फोट झाला असे बस्तरचे पोलीस महानिरीक्षक एसआरपी कल्लुरी यांनी सांगितले. सुरुंगरोधक वाहन ११ पोलिसांना घेऊन चोलनार छावणी येथून निघाले व ते रस्त्याचे काम चालू असलेल्या भागात जात होते त्यावेळी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात पाच जवान शहीद झाले तर सातजण जखमी झाले. या घटनेनंतर तेथील कुमक वाढवण्यात आली असून जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी काल कंकेर जिल्ह्य़ात सतरा वाहने पेटवून दिली होती त्यात कुणी जखमी झाले नव्हते. कंकेरचे पोलीस अधीक्षक जितेंद्र सिंह मीणा यांनी सांगितले की, नक्षलवाद्यांच्या गटाने सुरक्षा जवानांवर बेछूट गोळीबार केला. छोटो बैथिया येथे सीमा सुरक्षा दलाच्या छावणीजवळ ते गस्त घालीत असताना बंदे पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री उशिरा ही चकमक झाली. हुतात्मा जवानाचे नाव रमेश कुमार सोळंकी असून तो मूळ उत्तराखंडचा आहे. गोळीबारात जखमी झाल्यानंतर त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले पण त्याचा मृत्यू झाला असे पोलीस अधीक्षक जितेंद्र सिंह मीणा यांनी सांगितले.