आज बाल दिनाच्या दिवशी एका शालेय बसचा मोठा अपघात होता होता सुदैवाने टळला. बस चालकाच्या बेजाबादारपणामुळे ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खड्ड्यात जात  होती. दरम्यान बसमधील मुलांच्या आराडाओरडीनंतर बस चालक व आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बस कशीबशी थांबवली. यानंतर पोलिसांच्या मदतीने बसमधील मुलांना व बसला क्रेनच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, बिहारची राजधानी पाटणामधील मिठापूर बस स्थानकाजवळ ही घटना घडली. बस चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली होती व तो लघूशंकेसाठी खाली उतरला होता. दरम्यान ही बस अचानक रस्त्याच्या कडेला  असलेल्या उतारावरील खड्ड्याकडे जाऊ लागल्याने मुलांनी आराडाओरड सुरू केली. यानंतर बस चालक व आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत कशीबशी बस थांबवली. नंतर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने मुलांना व बसला देखील बाहेर काढण्यात आले.

आम्ही सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले आहे. बस चालकाच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक जीवन प्रसाद यांनी दिली आहे. मागील महिन्यात १० ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथे एक प्रवासी वाहतूक बस व स्कूल बसचा अपघात झाला होता. या अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाले होते. तर उत्तराखंड येथील गढवालमध्ये एका स्कूल बसला झालेल्या अपघातात नऊ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण गंभीर जखमी देखील झाले होते.