अरुणाचल प्रदेशातून बेपत्ता झालेले तरुण अपेक्षेप्रमाणे चिनी लष्कराच्या म्हणजे पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ताब्यात असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचे चीनच्या लष्कराने अपहरण केल्याचे सांगण्यात आले होते. आता चीनचे लष्कर त्यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाली करणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली.

शुक्रवारी भारत-चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशातील अप्पर सिबासिरी जिल्ह्य़ातून पाच तरुण बेपत्ता झाल्याचे समजले होते. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने त्यांचे अपहरण केल्याची अटकळ होती त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. त्यानंतर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय लष्कराच्या संदेशाला हॉटलाइनवर प्रतिसाद देऊन हे पाच तरुण त्यांच्या भागात आल्याने त्यांना ताब्यात घेतल्याचे सांगितले. आता या पाच तरुणांना भारताच्या हवाली करण्यात येणार आहे.

युवक कामकाज मंत्री रिजीजू हे अरुणाचल प्रदेशचे खासदार असून पाच युवकांच्या अपहरणाची घटना त्यांच्याबरोबर जंगलात गेलेल्या इतर दोन जणांनी सांगितली होती. सेरा ७ या ठिकाणी चीनच्या लष्कराने या पाच जणांना ताब्यात घेतले होते. हे ठिकाण नाचोच्या उत्तरेला १२ कि.मी अंतरावर आहे. नाचो हे मॅकमोहन रेषेवरील शेवटचे प्रशासकीय परिक्षेत्र असून ते दापोरिजो या जिल्हा मुख्यालयापासून १२० कि.मी अंतरावर आहे.

चिनी लष्कराने अपहरण केलेल्यांची नावे टोक सिंगकाम, प्रसात रिंगलिंग, डोंगटू एबिया, तानू बाकेर, नगारू दिरी अशी आहेत. या पाच युवकांबाबत विचारणा केली असता चीनने उडवाउडवीची उत्तरे दिली होती.

तुम्ही जे सांगता आहात त्यातले मला काही माहिती नाही असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी या तरुणांच्या अपहणाबाबत सांगितले. भारत-चीन दरम्यान सीमेवर संघर्ष तीव्र असताना ही घटना झाली आहे. मार्चमध्ये २१ वर्षीय युवकास पीपल्स लिबरेशन आर्मीने असापिला भागातून नेले होते.