अमेरिकेत कॅपिटॉलमधील रणकंदनाच्या वेळी त्या देशाचे ध्वज तर फडकत होतेच, पण भारताचा ध्वज घेतलेली एक व्यक्तीही तेथील निदर्शकांमध्ये होती. हा विषय शुक्रवारी समाजमाध्यमांवर विशेष चर्चेचा ठरला. अमेरिकेतील सुकर सत्ता हस्तांतरण हाणून पाडण्यासाठी घडलेल्या हिंसाचारावेळी तिरंगा फडकल्याने अनेकांनी संताप आणि उद्विग्नता व्यक्त केली.

तिरंगा फडकवणारी व्यक्ती कोण होती, हे जाणून घेण्यासाठी अनेकांनी इंटरनेटवर संशोधन केले. समाजमाध्यमांवरील हा वाद भाजप खासदार वरुण गांधी यांनी ट्विटरवर टाकलेल्या संदेशावरून सुरू झाला. त्यांच्याप्रमाणेच नंतर अनेकांनी कॅपिटॉल हिलच्या त्या रणकंदनात तिरंगा फडकल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले. नंतर काँग्रेसचे नेते शशी थरूर आणि वरुण गांधी यांच्यात समाजमाध्यमावर वाद-विवाद रंगला. त्या रणकंदनात आपला सहभाग नको होता, असे वरुण गांधी यांनी म्हटले होते. त्यावर, भारतातील काही लोकांच्या मानसिकतेचे लोक अमेरिकेतही आहेत आणि त्यात भारतीयही आहेत हे दिसते, अशी टीका खासदार शशी थरूर यांनी केली. त्यांना वरुण गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. गांधी म्हणाले, ‘‘जे भारतीय ध्वजाचा स्वाभिमानासाठी वापर करतात त्यांनाही दोष दिला जातो. काही वेळा ध्वजाचा वापर चुकीच्या कारणासाठी केला जातो. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी निदर्शनांमध्ये देशाच्या ध्वजाचा वापर झाला होता. माझ्यासाठी हा ध्वज अभिमानाचा विषय आहे.’’

कॅपिटॉल हिल येथील हिंसाचारावेळी तिरंगा फडकावणाऱ्या व्हिन्सेंट झेवियर पलाथिकल या भारतीय वंशाच्या व्यक्तीने वरुण गांधी आणि शशी थरूर यांना उद्देशून ट्वीट केले. त्यांनी फेसबुक आणि अन्यत्र संदेश प्रसारित केले. त्यात त्यांनी, ‘‘अमेरिकाच नव्हे तर इतर देशांच्या देशभक्तांनीही मतदानातील गैरप्रकारांविरोधातील आंदोलनात सहभागी होऊन शांततामय निदर्शने केली. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचे वाटते त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करून ट्रम्प यांना पाठिंबा दिला’’, असे म्हटले होते.

ट्रम्प यांच्याकडून हल्ल्याचा निषेध

अमेरिकी कॅपिटॉलवर (संसद) मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेध केला आहे. ट्रम्प यांनी यू टय़ूबच्या माध्यमातून तयार केलेली चित्रफीत व्हाइट हाऊसने प्रसारित केली आहे. ‘‘निदर्शकांनी संसदेत घुसून अमेरिकी लोकशाहीच्या सिंहासनाचा अवमान केला आहे. ज्यांनी हिंसाचार आणि विध्वंस केला ते अमेरिकेचे प्रतिनिधित्व करीत नाहीत. त्यांना त्याची किंमत मोजावी लागेल’’, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
‘तो’ ट्रम्प यांचा समर्थक : भारतीय-अमेरिकी व्यक्तींच्या वतीने ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्या गटाचे नेतृत्व केरळमधून अमेरिकेत गेलेले व्हिन्सेंट झेवियर पलाथिकल यांनी केले. ते मूळचे कोचीमधील चम्बकारा या गावचे आहेत. त्यांचा गट हिंसाचारात कुठेही सहभागी नव्हता.