२०१७ हे वर्ष देशाच्या आणि राज्याच्या गुन्हेगारी क्षेत्राच्या दृष्टीने खळबळजनकच ठरले. प्रद्यूम्न ठाकूर हत्याप्रकरणापासून ते सांगलीतील अनिकेत कोथळे या आरोपीची हत्या करणाऱ्या पोलिसांमुळे गुन्हेगारीचा विकृत चेहराच समोर आला. तर दुसरीकडे कोपर्डी प्रकरणातील दोषींना झालेल्या फाशीच्या शिक्षेने पीडितेला न्याय मिळवून दिला. या वर्षभरातील गुन्हेगारी घटना आणि न्यायालयाने दिलेल्या महत्त्वाच्या निकालांचा घेतलेला हा आढावा….

१. कोपर्डीतील नराधमांना फाशीची शिक्षा
कोपर्डीतील १५ वर्षांच्या शालेय मुलीवर तिघा नराधमांनी अत्याचार करून तिचा अत्यंत निर्दयपणे खून केल्याची घटना १३ जुलै २०१६ रोजी घडली होती. या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात झाली. जवळपास सोळा महिन्यांनी न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागला. २९ नोव्हेंबर २०१७ रोजी या प्रकरणात अहमदनगरमधील जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षेचा निर्णय दिला. न्यायालयाने जितेंद्र ऊर्फ बाबुलाल शिंदे (२५), संतोष गोरख भवाळ (३०) व नितीन गोपीचंद भैलुमे (२६) या तिघांना फाशीची शिक्षा सुनावली. या निकालाविरोधात दोषींना वरिष्ठ न्यायालयात धाव घेता येणार आहे.

२. नितीन आगेला न्याय कधी मिळणार?
राज्यभर गाजलेल्या जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन राजू आगे या अल्पवयीन दलित मुलाचा खून केल्याच्या आरोपातून न्यायालयाने सर्व आरोपींची २३ नोव्हेंबर रोजी मुक्तता केली. सचिन ऊर्फ आबा हौसराव गोलेकर (२१), शेषराव रावसाहेब येवले (४२), नीलेश महादेव गोलेकर (२३), विनोद अभिमन्यु गटकळ (२३), राजकुमार शशिराव गोलेकर (२४), भुजंग सुर्भान गोलेकर (४०), सिद्धेश्वर विलास गोलेकर (२३), संदीप तुकाराम शिकारे (२४), विशाल हरिभाऊ ढगे (१९) व साईनाथ रावसाहेब येवले (४२) या आरोपींची खटल्यातून मुक्तता करण्यात आली. या खटल्यात एकूण १३ आरोपी होते. त्यातील तीन अल्पवयीन होते तर एक आरोपी साईनाथ येवले याचा खटला सुरू असतानाच मृत्यू झाला होता. या खटल्यात एकूण २६ साक्षीदार तपासण्यात आले होते. यातील १६ साक्षीदार फितूर झाले आणि न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी आरोपींची सुटका केली. या निर्णयाला राज्य सरकारने औरंगाबाद न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे.

३. पोलीस की गुंड…. सांगलीतील अनिकेत कोथळे हत्याप्रकरण
पोलीस कोठडीतील क्रौर्याचा नमुना सांगलीत समोर आला होता. चाकूचा धाक दाखवून अभियंत्याला लुटल्याप्रकरणी ६ नोव्हेंबर रोजी सांगलीतील पोलिसांनी अनिकेत कोथळे (२५) आणि अमोल भंडारी या दोघांना अटक केली होती. न्यायालयाने या दोघांनाही १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन्ही आरोपींना ६ नोव्हेंबररोजी रात्री साडे नऊला चौकशीसाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कार्यालयात नेले. चौकशीदरम्यान अनिकेतला उलटे टांगून पोलिसांनी मारहाण केली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अनिकेतचा मृत्यू झाला. पोलिसांनी अनिकेतचा मृतदेह आंबोली घाटात नेऊन जाळला. सुरुवातीला अनिकेत आणि अमोल पोलीस ठाण्यातून पसार झाल्याचा बनाव पोलिसांनी रचला. मात्र, आरोपींच्या पालकांनी पाठपुरावा केल्याने हे प्रकरण बाहेर आले. शेवटी पोलिसांनी युवराज कामटे व अन्य सहा जणांना अटक केली. पोलीस खात्याचे वाभाडे काढणाऱ्या या घटनेने गृहखात्याची नाचक्की केली. सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे आणि उपअधीक्षक डॉ. दिपाली काळे यांची देखील या प्रकरणामुळे बदली करण्यात आली होती.

४. ‘मंजूताई’साठी बंड करणाऱ्या महिला कैद्यांनी फोडली तुरुंगातील अत्याचारांना वाचा
भायखळा तुरुंगातील वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाने देशभरातील तुरुंगातील भीषण वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणले. २३ जून रोजी जेलर मनीष पोखरकरसह सहा जणांनी मंजुळा शेट्येला मारहाण केली होती. मंजुळा हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होती. येरवडा कारागृहातील चांगल्या वर्तवणुकीमुळे मंजुळाला वॉर्डन म्हणून नेमण्यात आले. यानंतर त्यांची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली होती. भायखळा तुरुंगातही मंजुळाने अल्पावधीतच महिला कैद्यांचा विश्वास संपादन केला. मात्र हीच गोष्ट बहुधा तुरुंगातील अधिकाऱ्यांना खूपत होती. अंडीपावांचा हिशोब लागत नसल्याच्या क्षुल्लक कारणावरुन त्यांनी मंजुळाला मारहाण केली आणि यात मंजुळाचा मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने मनीषा पोखरकर, बिंदू नाईकोडी, वसीमा शेख, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे आणि आरती शिंगणेविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. याप्रकरणात हत्या, पुरावा नष्ट करणे अशा विविध कलमांखाली आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात इंद्राणी मुखर्जी साक्षीदार आहे. हत्येआधी मंजुळावर शारीरिक अत्याचार घडल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही.

५. रायन इंटरनॅशनलमध्ये निरागसतेची हत्या… ती पण परीक्षा टाळण्यासाठी
पालक- शिक्षक बैठक आणि परीक्षा टाळण्यासाठी गुरुग्राममधील रायन इंटरनॅशनल या शाळेतील ७ वर्षांच्या प्रद्यूम्न ठाकूरची हत्या करण्यात आली. ७ सप्टेंबर रोजी प्रद्यूम्नचा मृतदेह शाळेच्या स्वच्छतागृहात सापडला होता. सुरुवातीला गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणात शाळेतील बसवाहक अशोककुमारला अटक केली. मात्र, पालकांच्या दबावामुळे हरयाणा सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. जवळपास दोन महिन्यांनी म्हणजेच ९ नोव्हेंबर रोजी सीबीआयने या प्रकरणात याच शाळेत ११ वीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक केली. सीसीटीव्ही फुटेज, न्यायवैद्यक चाचण्या आणि शाळेतील शिक्षक- विद्यार्थ्यांची चौकशी या आधारे सीबीआयने ही कारवाई केली.

६. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गीं पाठोपाठ गौरी लंकेश यांचीही हत्या
राज्यात अनंत चतुदर्शीनिमित्त ( ५ सप्टेंबर) गणेश विसर्जनाची धूम सुरु असतानाच बेंगळुरुत ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. गौरी लंकेश या बेंगळुरू येथील ‘लंकेश पत्रिका’ या साप्ताहिकाच्या संपादक होत्या. गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी अनोळखी हल्लोखोरांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. विविध वर्तमानपत्रांमध्ये त्या स्तंभलेखनही करायच्या. वृत्त वाहिन्यावर प्राइम टाइममध्ये होणाऱ्या विविध चर्चेच्या कार्यक्रमांत त्यांच्या सहभाग असायचा. त्या देशातील असहिष्णुता आणि हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू असलेल्या उन्मादाच्या प्रखर विरोधक होत्या. ज्या पद्धतीने उजव्या विचारसरणीला विरोध करणाऱ्या विचारवंतांची हत्या करण्यात आली. त्याच पद्धतीने हे हत्याकांड घडले होते. या प्रकरणात विशेष तपास पथकही स्थापन करण्यात आले. या प्रकरणातील संशयितांचे रेखाचित्रही जारी करण्यात आले. मात्र, अद्याप आरोपींपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

७. स्वयंघोषित गोरक्षकांचा हिंसाचार
राजस्थानमधील अलवार येथील डेअरी चालक पहलू खान यांच्या हत्या प्रकरणाने देशभरातील स्वयंघोषित गोरक्षकांचा हिंसाचार समोर आला होता. १ एप्रिल रोजी पहलू खान अलवार येथून हरयाणा येथे जनावरे घेऊन जात होते. गो तस्करीच्या संशयातून एका टोळक्याने त्यांना बेदम मारहाण केली होती. यात जखमी झालेले पहलू खान यांचा तिसऱ्या दिवशी मृत्यू झाला होता. या प्रकरणातील सर्व आरोपींना राजस्थान पोलिसांनी सप्टेंबर महिन्यात क्लीन चिट दिली होती.

८. मोकाट झुंडशाही….रेल्वेत बसण्याच्या जागेवरुन जुनैदची हत्या
रेल्वेत बसण्याच्या जागेवरुन झालेल्या वादावादीनंतर जमावाने केलेल्या हल्ल्यात जुनैद खान या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना हरयाणात घडली होती. २३ जून रोजी घडलेल्या या घटनेने देशभरात खळबळ माजली होती. जुनैदला मारहाण करणाऱ्या तरुणांनी ‘गोमांस खाणारे’ असे म्हणत जुनैद आणि त्याच्या भावंडांच्या डोक्यावरील टोपी उडवून लावली आणि दाढी खेचण्याचा प्रयत्न केला होता, यानंतर त्यांनी केलेल्या अमानूष मारहाणीत जुनैदचा मृत्यू झाला. हरियाणातील बल्लभगडवरुन परतत असताना जुनैदचा मृत्यू झाल्याने खान कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. याप्रकरणातील एका आरोपीला धुळे येथून अटक करण्यात आली होती.

९. नो वन किल्ड आरुषी
२००८ सालच्या आरुषी तलवार आणि घरातील नोकर हेमराज खून प्रकरणात नुपूर तलवार आणि राजेश तलवार या दोघांची अलाहाबाद हायकोर्टाने १२ ऑक्टोबर रोजी सबळ पुराव्या अभावी मुक्तता केली. मे २००८ मध्ये तलवार यांच्या नोएडातील निवासस्थानातील खोलीत आरुषी गळा चिरलेल्या अवस्थेत मृतावस्थेत सापडली होती. तर सुरुवातीला बेपत्ता असलेला घरातील नोकर हेमराज (४५ वर्ष) याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी घरातील गच्चीवर आढळला होता. याप्रकरणी सीबीआयने आरुषीच्या आई- वडिलांनाच अटक केली होती. जवळपास चार वर्षे तलवार दाम्पत्य तुरुंगात होते. सध्या ते तुरुंगातून बाहेर आले असून हेमराजच्या कुटुंबीयांनी या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.

१०. वैद्यकीय महाविद्यालयातील लाचखोरीचे प्रकरण
लखनौतील वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्टाचाराप्रकरणी ओदिशातील उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश इशरत मसरुर कुद्दुसी आणि अन्य पाच जणांना सीबीआयने २१ सप्टेंबर रोजी अटक केली. या प्रकरणाने न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचाराची पोलखोलच केली. लखनौतील वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले होते. राष्ट्रीय वैद्यक परिषदेने या महाविद्यालयास नव्याने प्रवेश देण्यास मनाई केली. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचले. मात्र या प्रकरणात तपास करणाऱ्या सीबीआयच्या चौकशीत धक्कादायक प्रकार उघड झाला. ओदिशा न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आय. एम. कुद्दुसी यांनी सुप्रीम कोर्टात महाविद्यालयाच्या बाजूने निकाल लागावा, यासाठी लाच घेतल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात एसआयटी चौकशीची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली होती. या प्रकरणामुळे सुप्रीम कोर्टाची प्रतिमा डागाळल्याचे मत खंडपीठाने मांडले होते.

११. बाबरी प्रकरणात अडवाणी अडचणीत
भारतीय राजकारणाला वेगळे वळण देणाऱ्या १९९२ मधील बाबरी मशीद प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी तसेच उमा भारती यांच्यावर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप ठेवून खटला चालवण्यात यावा आणि दोन वर्षात हे प्रकरण निकाली काढावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने १९ एप्रिल रोजी दिले होते. या प्रकरणात अडवाणींसह साध्वी ऋतंबरा, विनय कटियार आणि विष्णू हरी दालमिया असे एकूण सहा आरोपी आहे.

१२. चारा भोवला…. लालू आणखी एका खटल्यात दोषी
देशभर गाजलेल्या चारा घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना विशेष सीबीआय न्यायालयाने २३ डिसेंबर रोजी दोषी जाहीर केले. तर माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांच्यासह लोकलेखा समितीचे माजी अध्यक्ष आणि सध्या भाजपामध्ये असलेले ध्रुव भगत, माजी महसूल अधिकारी ए. सी. चौधरी, पशुखाद्य पुरवठादार सरस्वती चंद्र आणि साधना सिंग आणि माजी मंत्री विद्यासागर निषाद यांना न्यायालयाने आरोपमुक्त केले. तब्बल २१ वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला. महसूल विभागाच्या देवघर कोषागारातून १९९१ ते १९९४ या वर्षांत ८९ लाख २७ हजार रुपयांचा हा गैरव्यवहार झाला होता. निकालानंतर लालूंसह इतर १५ दोषींना पोलिसांनी अटक केली.

१३. काँग्रेसवरील कलंक दूर…. टू जी घोटाळ्यात ए राजा दोषमुक्त
काँग्रेसप्रणित यूपीएसाठी डोकेदुखी ठरलेल्या टू जी घोटाळ्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने २१ डिसेंबर रोजी महत्त्वपूर्ण निकाल दिला. टू जी घोटाळ्याशी संबंधित तीनही खटल्यांमधून माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुक खासदार कनिमोळी यांच्यासह सर्व ३५ आरोपींना दोषमुक्त केले. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या पराभवास २ जी आणि कोळसा हे दोन घोटाळे मुख्यत्वे जबाबदार ठरले होते. यापैकी २ जी घोटाळ्यात न्यायालयाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्याने काँग्रेसवर बसलेला ठपका दूर झाला. टू जी घोटाळ्यामुळे सरकारचे ३० हजार ९८४ कोटी रुपयांचा महसुली फटका बसल्याचा सीबीआयचा आरोप होता. २ फेब्रुवारी २०१२ रोजी सुप्रीम कोर्टाने टू जी स्पेक्ट्रमचे परवाने रद्द केले होते.

१४. राजस्थानमधील क्रूरतेचा कळस
राजस्थानमधील राजमसंद येथील देव हेरिटेज मार्गावर महम्मद भट्टा शेख या मजुराच्या हत्येच्या घटनेने खळबळ माजली होती. ६ डिसेंबर रोजी भट्टाची शंभूनाथ रायगारने अत्यंत निर्दयीपणे हत्या केली होती. हत्या करतानाचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला. यात त्याने ‘लव्ह जिहाद थांबवले नाही तर जिहादींची अशीच अवस्था केली जाईल’ अशी धमकी दिली होती. त्यामुळे हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याची चर्चा झाली होती.