मलेशिया एअरलाइन्सचे एमएच-३७० हे विमान गेल्या वर्षी बेपत्ता झाले तेव्हा हवाई वाहतूक नियंत्रण (एटीसी) करणारा पर्यवेक्षक कामावर असतानाच झोपलेला होता, असे या विमान दुर्घटना चौकशीच्या अंतरिम अहवालात नमूद करण्यात आले आहे.
कुआलालम्पूर हवाई वाहतूक नियंत्रण पर्यवेक्षक आणि मलेशिया एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांमधील संभाषणावरून स्पष्ट होते की, मध्यरात्री १.२० ते पहाटे ५.२० वाजेपर्यंत पर्यवेक्षक झोपलेला होता. त्यानंतर नियंत्रकाने ५.२० वाजता मलेशिया एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांशी चार मिनिटे संभाषण केले.
कुआलालम्पूर हवाई वाहतूक नियंत्रण केंद्र आणि हो ची मिन्हं शहर हवाई वाहतूक नियंत्रण यांच्यात काही सकारात्मक संभाषण झाले आहे का, असे एअरलाइन्सचा अधिकारी सातत्याने नियंत्रकाला विचारत होता. त्यानंतर नियंत्रकाने सांगितले की, आपण झोपलेल्या पर्यवेक्षकाला उठविले.
मध्यरात्री ३ वाजल्यानंतर आपण केवळ मनोऱ्यांवर लक्ष ठेवले होते त्यामुळे सविस्तर माहितीबाबत अनभिज्ञ आहोत, असे नियंत्रकाने सांगितल्याचे स्टार ऑनलाइनने म्हटले आहे. त्यानंतर आपण पर्यवेक्षकाला उठविले आणि त्याला शेवटचा संपर्क कधी झाला त्याची पुन्हा तपासणी करण्यास सांगितले, असे नियंत्रक म्हणाला.