गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने ATF अर्थात Aviatiom Turbine Fuel च्या किंमतीत वाढ होत असल्यामुळे केंद्र सरकारने शुक्रवारी किमान प्रवासी भाड्याच्या मर्यादेमध्ये (Lower Fare Band) ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. कमी अंतराच्या अर्थात ४० मिनिटांपर्यंत प्रवासवेळ असणाऱ्या तिकिटांवर ही ५ टक्के वाढ लागू होणार आहे. मात्र, त्याचवेळी १८० ते २१० मिनिटे प्रवास वेळाच्या कमाल प्रवासी भाड्याच्या मर्यादेमध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. अवघ्या महिन्याभरापूर्वीच सरकारने या बँडच्या दरांमध्ये १० ते ३० टक्क्यांमध्ये वाढ केली होती. आता पुन्हा ही वाढ करण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर ४० मिनिटांपर्यंतच्या प्रवासासाठीच्या तिकिटांचे दर वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली आहे.

 

किमान प्रवासी भाड्यावरील मर्यादा वाढवण्यामागचं कारण हरदीपसिंग पुरी यांनी स्पष्ट केलं आहे. “गेल्या काही दिवसांपासून सातत्याने एटीएफच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे. एका महिन्यात किमान ३ वेळा एकूण प्रवासी वाहतूक ३ लाख ५० हजारांपर्यंत गेल्यास १०० टक्के क्षमतेनं हवाई वाहतूक सुरू केली जाईल”, असं हरदीप सिंग पुरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

“गेल्या काही दिवसांमध्ये विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. अनेक राज्यांनी प्रवेशावेळी आरटीपीसीआर चाचणी करणं सक्तीचं केल्यामुळे आणि निर्बंध लादल्यामुळे ही घट दिसून आली आहे. त्यामुळेच, प्रवासी वाहतूक क्षमतेवर ८० टक्क्यांचं बंधन घालण्याचा निर्णय आम्ही घेतला”, असं देखील हरदीप सिंग पुरी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.