ऑनलाइन रिटेल कंपनी फ्लिपकार्टने आपल्या कर्मचाऱ्याकडे असलेले १०० मिलियन डॉलर (६७० कोटी रूपये) किमतीचे शेअर परत घेतले आहेत. हे देशातील एखाद्या खासगी कंपनीकडून सर्वांत मोठ्या एम्प्लॉयी स्टॉक ऑप्शन्स (इएसओपी) पैकी एक आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे ३००० हून अधिक माजी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

बेंगळुरू स्थित ई-रिटेलर कंपनीने बुधवारी सांगितले की, फ्लिपकार्ट समूहाचे कर्मचारी बायबॅक ऑफरमध्ये सहभागी झाले आणि देशातील सर्वांत मोठ्या इएसपीओ रिपर्चेज प्रोग्राम्सचा भाग बनले. बायबॅक ऑफर फ्लिपकार्ट, मिंत्रा, जबाँग आणि फोन-पेच्या सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आला होता. फ्लिपकार्टने म्हटले की, त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कंपनीतील त्यांचे काही स्टॉक परत देण्याची ही पाचवी संधी होती. आकाराच्या बाबतीत फ्लिपकार्टच नव्हे तर देशातील अन्य कोणत्याही स्टार्टअप कंपनीतील हा सर्वांत मोठा बायबॅक कार्यक्रम आहे. आपले शेअर विकलेले दोन कर्मचारी म्हणाले की, ही योजना कंपनीमध्ये कार्यरत असलेले कर्मचारी आणि जे कंपनीत येऊ इच्छितात या दोघांसाठी खूप महत्वाची आहे.

फ्लिपकार्टचे अध्यक्ष सचिन बन्सल आणि समूहाचे सीईओ बिन्नी बन्सल म्हणाले, कर्मचारी आमची ताकद आहेत. त्यांच्याशिवाय फ्लिपकार्ट भारतात ई-कॉमर्स उद्योग उभारू शकले नसते. एका संघटनेच्या रूपात आम्ही फ्लिपकार्टच्या यशात त्यांच्याही भागीदारीची अपेक्षा करतो. इएसओपी रिपर्चेज कार्यक्रम याच संस्कृतीचा विस्तार आणि अनेक वर्षांपासूनचे कर्मचाऱ्यांचे समर्पण आणि कठीण परिश्रम यासाठी आभार मानण्याचे माध्यम आहे. यापूर्वी पेटीएम आणि लॉजिस्टिक्स व्हेंचर ब्लॅकबक कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अशाच पद्धतीचे बायबॅक ऑप्शन आणले होते. ऑनलाइन कंपनी सायट्रसच्या अधिग्रहणावेळीही कंपनीच्या ५० कर्मचाऱ्यांनी आपले शेअर विकून चांगली कमाई केली होती.