आसाममध्ये झालेल्या पावसामुळे तिथल्या १० नद्यांना महापूर आला आहे. यामुळे आसाममध्ये पुराचा कहर माजला आहे. या पुराचा फटका १७ लाखापेक्षा जास्त लोकांना बसला आहे, तर ४५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद सरकार दरबारी करण्यात आली आहे. या पुरामुळे आसामची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आसाममधले २४ जिल्हे पूरग्रस्त आहेत. तर सुमारे २ हजारांपेक्षा जास्त खेडी जलमय झाली आहेत.

एक लाख हेक्टर पेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालं आहे. या सगळ्या परिस्थितीनंतर आसाममध्ये चारा छावण्या तसंच ३०० पेक्षा जास्त मदत शिबीरं सुरू करण्यात आली आहे. या शिबिरांमध्ये ३१ हजारपेक्षा जास्त पूरग्रस्त लोकांनी आसरा घेतला आहे.

या पुराचा फटका फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही बसला आहे. आसामच्या काझीरंगा राष्ट्रीय अभय अरण्याचा ८० टक्के भाग जलमय झाला आहे. इतक्या भयंकर पुरामुळे २५ प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. अनेक पूरग्रस्त लोक हे ग्रामिण भागातले आहेत. ज्या लोकांना पुराचा फटका बसला आहे त्यांना मदत मिळावी म्हणून राज्य सरकारनं मदतीच्या योजना आखल्या आहेत. जास्तीत जास्त प्रमाणात लोकांपर्यंत मदत पोहचविण्यासाठी प्रय़त्न करण्यात येत आहेत.

पुरामुळे जे लोक बेघर झालेत त्यांनाही सुरक्षित स्थळी पोहचवण्याचं काम केलं जातं आहे. लखीमपूर, गोलाघाट, जोरहट, काचर, धीमाजी, विश्वनाथ, करीमगंज, शोणितापूर, दरांग, होजई, मजुली, बारपेटा आणि नागौण या जिल्ह्यांमधली हजारो गावं पुरामुळे संकटात सापडली आहेत. १ लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती जलमय झाल्यानं शेतकरीही हवालदिल झाला आहे.

महाराष्ट्रात पावसानं दडी मारली आहे. पाऊस कधी येईल याची वाट बळीराजा बघतो आहे, महाराष्ट्रातल्या बळीराजावर दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे. तर आसाममध्ये याच्या अगदी उलट परिस्थिती आहे. पावसाचा कहर इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की पावसामुळे आसाम जलमय झालं आहे. आता या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आसाम प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. लोकांना जास्तीत जास्त मदत कशी पोहचवता येईल आणि या संकटाचा सामना कसा करता येईल याकडे आसाम सरकार जास्तीत जास्त लक्ष देत आहे.