News Flash

महाराष्ट्रासह चार राज्यात पावसाचा हाहाकार, अमित शाह करणार बेळगावचा हवाई दौरा

बेळगाव जिल्ह्यातील पूराचा फटका बसलेल्या ठिकाणांची अमित शाह पाहणी करणार

(छायाचित्र सौजन्य - एएनआय)

मुसळधार पावसामुळे ओढवलेली पूरस्थिती आणि भूस्खलन यामुळे केरळ व कर्नाटकमध्ये भीषण संकट ओढवले आहे. तसंच, महाराष्ट्र आणि गुजरातलाही मुसळधार पाऊस आणि पुराचा तडाखा बसला आहे. या राज्यांमध्ये 125 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्रात 27, गुजरातमध्ये 22, कर्नाटकमध्ये 35 तर केरळमधील मृतांचा आकडा 57 वर पोहोचला आहे. अशातच हवामान विभागाने दक्षिणेतील राज्यांमध्ये पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मदतकार्यासाठी येथे बचाव पथकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यात. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज(दि.11) कर्नाटकातील पूरग्रस्त बेळगावची हवाई पाहणी करणार आहेत. बेळगाव जिल्ह्यातील पूराचा फटका बसलेल्या ठिकाणांची अमित शाह पाहणी करणार असल्याची माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे. लष्कराच्या बचाव पथकांना मदतकार्य वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कर्नाटकमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत 35 लोक मरण पावले आहेत. बेळगावसह बागलकोट, विजयपुरा, रायचूर, यादगिर, गदग, उत्तर कन्नड, हावेरी, हुबळी- धारवाड, दक्षिण कन्नड, चिकमगळुरू व कोडागु या जिल्ह्य़ांना सर्वाधिक तडाखा बसला आहे. तुंगभद्रा नदीच्या पाण्यामुळे दावणगेरे जिल्ह्य़ाचे अनेक भाग पाण्याखाली गेले असून अनेक रस्ते बंद झाले आहेत. सकलेशपूरमधील मारनहळ्ळी येथे दरडी कोसळल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

पूर व पावसाचा तडाखा बसलेल्या दक्षिण महाराष्ट्रातही अडकून पडलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. केरळमध्ये गुरुवारपासून पाऊस, पूर व भूस्खलन अशा घटनांमध्ये बळी गेलेल्यांची संख्या 57 वर पोहचली आहे. राज्यात सुमारे सव्वा लाख लोक विस्थापित झाले आहेत. वायनाड व कोळिक्कोड या जिल्ह्य़ांना सगळ्यात जास्त तडाखा बसला असून तेथील प्रत्येकी २५ हजार लोकांचा विस्थापितांमध्ये समावेश आहे.

बचावकार्याला आपल्या सरकारचे प्राधान्य असल्यामुळे राज्यातील लोकांनी काळजी करू नये, असे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ांमध्ये पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्याने पूरपरिस्थितीत सुधारणा झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 1:45 pm

Web Title: flood in maharashtra kerala karnataka and gujrat union home minister amit shah will do an aerial survey of the flood affected areas of belagavi district sas 89
Next Stories
1 बकरी ईद : ‘ताजमहल’मध्ये तीन तास मोफत प्रवेश
2 पाकिस्तानात ‘समुद्री जिहाद’चा कट, नौसेना ‘हाय अलर्ट’वर
3 काही त्रास तर नाही ना? अजित डोवालांचा काश्मिरींना प्रश्न; मिळालं ‘हे’ उत्तर
Just Now!
X