28 February 2021

News Flash

उत्तराखंडमध्ये प्रलय

इंडो-तिबेट पोलीस दलाचे जवान, राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कराच्या सहा तुकड्या बचावकार्य करीत आहेत.

 

हिमकडा कोसळला; १२५ हून अधिक मजूर दगावल्याची भीती

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील नंदादेवी हिमकड्याचा काही भाग कोसळून रविवारी १२५ हून अधिक मजुरांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत सात मृतदेह सापडले असून इतरांचा शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

हिमकडा कोसळल्याने आलेल्या प्रलयात अलकनंदा नदीवरील जलविद्युत केंद्रे आणि ऋषीगंगा नदीवरील लघू जलविद्युत प्रकल्प वाहून गेल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

नंदादेवी हिमकड्याचा काही भाग सकाळी कोसळल्यानंतर धौलीगंगा, ऋषीगंगा आणि अलकनंदा या गंगेच्या उपनद्यांना रविवारी दुपारी महापूर आला. त्यामुळे त्यांच्या काठांवरील डोंगराळ भागांत हाहाकार उडाला. या प्रलयामुळे ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन’चा (एनटीपीसी) धौलीगंगा नदीवरील तपोवन-विष्णूगड जलविद्युत प्रकल्प आणि ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्पाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. ऋषीगंगा नदीवरील एक लघू जलविद्युत प्रकल्पही वाहून गेल्याची माहिती इंडो-तिबेट सीमा पोलिसांच्या प्रवक्त्याने दिली.

महापूर आला तेव्हा या प्रकल्पांवर काम करणारे मजूर बोगद्यांमध्ये होते. त्यापैकी १२५जण अद्याप बेपत्ता आहेत. तपोवन प्रकल्पाच्या बोगद्यामधून १६ मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. आतापर्यंत सात मृतदेह सापडले असून १२५ मजूरांचा थांग लागत नसल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी दिली. दरम्यान, नवी दिल्लीत रविवारी संध्याकाळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती (एनसीएमसी)ची आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली होती.

इंडो-तिबेट पोलीस दलाचे जवान, राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कराच्या सहा तुकड्या बचावकार्य करीत आहेत. तर तीन हेलिकॉप्टरद्वारे दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करण्यात येत असून पूरग्रस्त भागांतील अनेक खेड्यांमध्ये मदतकार्य सुरू आहे.

या महाप्रलयात संपूर्ण एक छोटा जलविद्युत प्रकल्पच वाहून गेल्याचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी सांगितले. ‘एनटीपीसी’ प्रकल्पाचेही नुकसान झाल्याचे वृत्त आहे. या भागातील घरेही वाहून गेली आहेत. त्याचबरोबर सीमा भागातील छावण्यांशी संपर्क तुटला आहे, असे इंडो-तिबेट पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले. महापुरात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.

पौरी, टेहरी, रुद्रप्रयाग, हरिद्वार आणि देहरादून या जिल्ह्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे असून गंगेच्या काठावरील लोकांना सतर्क करण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) बचावकार्य करीत आहे.

धौलीगंगा या गंगेच्या उपनदीला आलेल्या पुराचे पाणी दोन ते तीन मीटर उंचीवरून वाहत होते. पावरी, टिहरी, रुद्रप्रयाग, हरिद्वार, देहरादून या भागांना महापुराचा फटका बसला आहे. नदी काठावरील अनेक खेड्यांतील लोकांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांच्याशी संपर्क साधून त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. एनडीआरएफची अतिरिक्त पथके बचावकार्यासाठी पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे २०० जवान दाखल झाले आहेत.

दुर्घटनाग्रस्त भागात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तैनात करण्यात आले असून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे. तेथील परिस्थितीवर आपले सातत्याने लक्ष आहे, असे ट्वीट गृहमंत्री शहा यांनी केले आहे.

लष्कराकडून मदतकार्य

लष्कराचे ४०० जवान घटनास्थळी मदतकार्य करत असून, दौन वैद्यकीय पथकेही पाठविण्यात आली आहेत. लष्कराचे अभियांत्रिकी कृती दलही घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे.

सतर्कतेचा इशारा

उत्तर प्रदेशात गंगा नदीकाठच्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीची जलपातळी वारंवार तपासण्याची सूचना या जिल्हा प्रशासनांना देण्यात आली आहे.

 

जलविद्युत प्रकल्पांची हानी

  • प्रलयात एक लघू जलविद्युत प्रकल्प वाहून गेला, तर ‘एनटीपीसी’च्या प्रकल्पाची हानी.
  • वीज प्रकल्पावर  १०० मजूर बंधाऱ्याचे, तर पन्नासहून अधिक जण बोगद्याचे काम करीत होते.
  • तपोवन वीज प्रकल्पाच्या बोगद्यातून १६ मजुरांची सुटका, १२५ अद्याप बेपत्ता.

चार लाखांची नुकसानभरपाई : या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सात जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांची नुकसानभरपाई उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी जाहीर केली.

 

उत्तराखंडमधील घटना दुर्दैवी आहे. संपूर्ण देश उत्तराखंडच्या पाठीशी असून, सुरक्षेसाठी प्रार्थना करीत आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2021 1:59 am

Web Title: flood in uttarakhand more than 125 workers are feared to have been killed in the avalanche akp 94
Next Stories
1 शेतकऱ्यांशी चर्चेस सरकार तयार- पीयूष गोयल
2 हिमनद्या वितळण्याचा वेग दुप्पट…
3 उत्तर प्रदेशात दक्षता
Just Now!
X