मुसळधार पावसामुळे जम्मू-काश्मीर राज्यामध्ये निर्माण झालेले महापुराची स्थिती सोमवारीही कायम होती. पुरात अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, सोमवारी शेकडो रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अजूनही हजारो रहिवासी गावांमध्ये अडकले असल्याने बचावकार्यासाठी ‘राष्ट्रीय आपत्कालिन व्यवस्थापन दला’च्या मदतीला नौदलाचे २०० सैनिक पाठविण्यात आले आहे. त्यांच्याबरोबत ७० नौका पाठविण्यात आल्या असून, नवी दिल्ली, जम्मू आणि श्रीनगरमध्ये नियंत्रण कक्ष बनविण्यात आले आहे.दरम्यान चार दिवसांनंतर वैष्णोदेवी यात्रा सुरु झाली असून, १७ हजार ७०० भाविक रवाना झाले आहेत.
गेल्या आठवडय़ापासून या राज्याला पावसाने तडाखा दिला आहे. मात्र सोमवारी पावसाचा जोर कमी झाल्याने बचावकार्यात कोणताही अडथळा आलेला नाही. पाऊस कमी झाला असला तरी श्रीनगरसह अनेक शहरांमधील पाण्याची पातळी कमी झाली नसल्याचे समजते. श्रीनगरमध्ये बचावकार्य वेगाने सुरू असून, डझनभर नौका तिथे आणण्यात आल्या आहेत. पाण्याचा निचरा करणे तिथे एक आव्हानच बनले आहे.अनेक शहरांमधील रहिवाशांनी घरांच्या छपराचा आणि गच्चीचा आसरा घेतला आहे.

२२००० रहिवासी सुरक्षित स्थळी
हवाई दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे बचावकार्य सुरू असून, दक्षिण काश्मीरमधील जवळपास २२००० रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली. त्यापैकी २००० रहिवासी श्रीनगरमधीलच आहेत.

सहा दशकानंतरचा मोठा पूर
जम्मू-काश्मीरमधील रहिवासी साठ वर्षांनंतर महापुराचा सामना करत आहेत. सहा दशकांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये अशीच पूरस्थिती होती. त्यामध्ये १५०पेक्षा अधिक जणांना प्राण गमवावे लागले होते.

‘सोशल नेटवर्किंग साइटची’ही मोलाची मदत
नवी दिल्ली :जम्मू-काश्मीरमधील पूरस्थितीची माहिती एकमेकांना देण्यासाठी ‘फेसबूक’, ‘ट्विटर’ यांसारख्या सोशल नेटवर्किंग साइटची मोलाची मदत झाली. या साइटद्वारे काश्मीरमधील बचावकार्य आणि अडकलेल्यांची माहिती पसरविण्यात आली, त्यामुळे अडकलेल्यांना लवकर मदत मिळू शकली. त्याशिवाय मदतीसाठी धनराशी गोळा करण्यासाठी या संकेतस्थळांनी मोलाची कामगिरी केली.राज्यातील विविध भागांमध्ये अडकलेले रहिवासी या संकेतस्थळांवर पूरस्थितीची छायाचित्रे आणि माहिती प्रसारित करत होते आणि मदतीची मागणी करत होते. ही माहिती केंद्रीय व राज्य पातळीवरील प्रशासनाकडे पोहोचल्यानंतर त्या दृष्टीने बचावकार्य करण्यात येत होते.‘‘माझे पालक इंदिरानगरमधील सीआरपीएफ छावणीजवळील इमारतीत अडकले आहे. त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे की नाही माहीत नाही. कृपया मदत करा’’ असे अंकूर रैना या तरुणाने ट्विट केल्यानंतर त्याला तात्काळ मदत पुरविण्यात आली. याचप्रमाणे अनेक तरुणांनी या संकेतस्थळाचा उपयोग मदतीसाठी केला.

‘ निवडणूकीबाबत आयोग ठरवणार’
जम्मू आणि काश्मीरला पुराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे तेथे विधानसभा निवडणूक घेण्याबाबत निवडणूक आयोगच निर्णय घेईल असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय आपत्तीचा संबंध निवडणुकीशी जोडणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात या वर्षी निवडणूक अपेक्षित आहे. मात्र निवडणूक केव्हा घ्यायची याचे सर्वाधिकार आयोगाकडे आहेत. त्यामुळे मी भाष्य करणे योग्य नाही असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.