बर्लिन : पश्चिम जर्मनी आणि बेल्जियमच्या काही भागांमध्ये आलेल्या पुरात किमान १०० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पूरग्रस्त भागांमध्ये मदतकार्य वेगाने सुरू असून बेपत्ता झालेल्या अन्य शेकडो जणांचा कसून शोध घेतला जात आहे, असे शुक्रवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. जर्मनीतील ऱ्हाइनलॅण्ड-पॅलटिनेट राज्यात ५० जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तर शेजारी असलेल्या उत्तर ऱ्हाइन-वेस्टफालिया राज्यात ४३ जणांचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.

इर्फस्टॅड्ट शहरात घरामध्ये अडकून पडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी मदतकार्य पथक तातडीने रवाना झाले असून अनेक जणांचा घरे कोसळून मृत्यू झाल्याचे प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सांगितले. आम्ही गुरुवारी रात्री ५० जणांची त्यांच्या घरातून सुखरूप सुटका केली, आणखी १५ जणांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रशासकीय अधिकारी फ्रॅन्क रॉक यांनी सांगितले. जर्मनीतील जवळपास १३०० जण अद्यापही बेपत्ता आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बेल्जियममध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून पाच जण अद्यापही बेपत्ता आहेत, मुसळधार पावसामुळे पुराचे पाणी गल्ल्यांमध्ये शिरले आणि त्यामध्ये अनेक गाड्या वाहून गेल्या आणि घरे कोसळली असे अधिकाऱ्यांनी सांगितले.