मध्यप्रदेशात धुळवडीच्या दिवशी राजकीय भूकंप झाला. कारण ज्योतिरादित्य शिंदे आणि इतर आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. आता या सरकारचे काय होणार? हे १६ मार्चला म्हणजेच उद्या ठरणार आहे. कारण राज्यपालांनी १६ मार्चला बहुमत चाचणीचे आदेश दिले आहे. मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांनी हे आदेश दिले आहेत एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे. १६ मार्चपासून मध्य प्रदेश सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आमदारांसाठी व्हीपही जारी केला आहे.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. त्यांना गद्दार असंही संबोधण्यात आलं. मात्र मी टीकेला उत्तर देणार नाही. मी यापक्षासाठी आणि परिवारासाठी १८ वर्षे निष्ठा दाखवली. मात्र मला वेळोवेळी डावलण्यात आलं असं ज्योतिरादित्य शिंदे यांनी बोलून दाखवलं. दरम्यान त्यांच्यासोबत काही आमदारही फुटले आहेत. त्यामुळे मध्यप्रदेश सरकार अल्पमतात आलं आहे. आता उद्या बहुमत चाचणीत काय होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सोमवारच्या बहुमत चाचणीत काँग्रेसला बहुमत सिद्ध करता आलं नाही तर कमलनाथ सरकार कोसळणार यात काहीही शंका नाही. असं झाल्यास भाजपाची सत्ता मध्यप्रदेशात येऊ शकते. मात्र नेमकं काय घडणार? हे सोमवारच्या बहुमत चाचणीनंतरच स्पष्ट होणार आहे.