तुम्ही अमेरिका किंवा लंडनला जायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. एरवी या देशांमध्ये जाण्यासाठी हजारो रुपये मोजणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे. wow air ने दिल्लीतून ही विशेष सुविधा सुरु केली आहे. आता इतक्या कमी पैशात इतका दूरचा प्रवास कसा काय? तर या तिकीटाच्या कमी किंमतीसाठी एक अट ठेवण्यात आली आहे. ही अट म्हणजे या प्रवासात तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचे सामान असून चालणार नाही. म्हणजे तुम्हाला हँडबॅगही हातात ठेऊन चालणार नाही. या प्रवासादरम्यान तुम्हाला केवळ तुमचे ‘पर्सनल आयटम’ सोबत ठेवता येतील असे सांगण्यात आले आहे. यामध्ये लॅपटॉप बॅग किंवा ऑफीस बॅग यांना परवानगी आहे. मात्र यामध्ये चेक इन बॅग किंवा सूटकेस सोबत ठेवता येणार नाही.

हा प्रवास दोन टप्प्यात करावा लागणार आहे. दिल्लाहून आईसलॅंडची राजधानी रेकजाविकपर्यंत जाता येईल. तिथून पुढे शिकागो, लॉस एंजेलिस, वॉशिंगटन, टोरंटो, बोस्टन, लंडन याठिकाणी जाता येणार आहे. मात्र या पुढील विमानात खाण्याची व्यवस्था नसेल असेही कंपनीने सांगितले आहे. कंपनीने आपल्या प्रमोशनल अॅक्टीव्हीटीसाठी ही ऑफर दिली आहे. कंपनीने ही ऑफर जाहीर केल्यानंतर काही कालावधीतच ग्राहकांनी या तिकिटांवर अक्षरश: उड्या मारल्या. यामध्ये सर्वात कमी तिकिट १३,५०० रुपये आहे. दिवाळी आणि डिसेंबर महिन्याच्या कालावधीत या दोन्ही ठिकाणी प्रवास करण्यासाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात त्यामुळे ही एक उत्तम संधी आहे. मात्र सामानाशिवाय प्रवास करण्याची अट असल्याने हे काहीसे अवघडही आहे.