राफेल फायटर उडवण्याचा आनंद हा मर्सिडिझ चालवण्यासारखाच आहे असं हवाई दल प्रमुख बी एस धनोआ यांनी म्हटलं आहे. ” एखादा माणूस जर मारुती कार चालवत असेल आणि त्याला मर्सिडिझ कार चालवण्यास दिली तर तो आनंदी होईल.मला अगदी तसाच आनंद राफेल फायटर जेट उडवल्यानंतर झाला” असं धनोआ यांनी म्हटलं आहे. इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये झालेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

जुलै महिन्यात बी.एस. धनोआ यांनी राफेल हे लढाऊ विमान फ्रेंच एअरबेसवरुन उडवलं होतं. त्याबाबतचा अनुभव त्यांनी इंडिया टुडेच्या कार्यक्रमात सांगितला. राफेल हे लढाऊ विमान भारतीय वायुदलाच्या ताफ्यात आल्याने वायुदलाचं बळ वाढणार आहे. राफेलची भूमिका एखाद्या गेम चेंजरसारखी असेल असंही धनोआ यांनी स्पष्ट केलं.

त्यांना याच कार्यक्रमात बालाकोट एअरस्ट्राईकबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, “भारतीय वायुदल कायमच अशा प्रकारच्या मोहिमेसाठी सज्ज असतं, अशा प्रकारची मोहिम राबवायची की नाही हा निर्णय मात्र सरकारकडून घेतला जातो. बालाकोटच्या वेळी आम्हाला आदेश देण्यात आले त्याआधीच मी अंदाज वर्तवला होता आणि वायुदलाला सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या होत्या.” असंही धनोआ यांनी स्पष्ट केलं.

एवढंच नाही तर “२००१ मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर आणि २६/११ या मुंबई हल्ल्यानंतरही आम्ही सीमेच्या पलिकडे जाऊन एअरस्ट्राईक करण्यासाठी सज्ज होतो. मात्र त्यावेळच्या सरकारने याबाबतची राजकीय इच्छाशक्ती दाखवली नाही त्यामुळे आम्हाला एअरस्ट्राईक करता आला नाही” असंही धनोआ यांनी या कार्यक्रमात सांगितलं.