भारतीय वायूदलातील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी यांनी मिग २१ हे लढाऊ विमान उडवत भारतीय संरक्षण दलात एक नवा इतिहास रचला आहे. १९ फेब्रुलारीला गुजरातच्या जामनगर येथील हवाई तळावरुन अवनी यांनी ‘फाइटर एअरक्राफ्ट मिग २१ बिसन’च्या साथीने आकाशात झेप घेतली. जवळपास ३० मिनिटांच्या या उड्डाणानंतर अवनी यांच्या फायटर एअरक्राफ्टने पुन्हा भूतलावर लँडिंग केलं.

चौकटीबद्ध करिअरच्या वाटेवर न जाता वेगळ्या दिशेला गेलेल्या अवनी यांचा संपूर्ण देशाला गौरव वाटत आहे. ‘फ्लाइंग ऑफिसर चतुर्वेदी यांनी मिग २१च्या केलेल्या यशस्वी उड्ड्णाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. भारतीय हवाई दलात महिला ऑफिसर्ना पुरुषांइतकेच प्राधान्य दिले जाते’, असे म्हणत देशासाठी हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे असल्याचे एअर चीफ मार्शल बी.एस. धनोआंनी ‘टाइम्स ऑइ इंडिया’शी संवाद साधताना स्पष्ट केले.

‘कोणत्याही देशाचे हवाई दल हे त्यात असणाऱ्या लढवय्यांमुळे ओळखले जाते. त्यामुळे एक लढाऊ वैमानिक होण्याचे माझे स्वप्न आहे. मला एक अशी वैमानिक व्हायचेय जिच्यावर थेट कारवाई करण्याच्या वेळेप्रसंगी तिचे वरिष्ठ निर्विवादपणे विश्वास ठेवू शकतात. शिवाय, मला सर्वोत्तम लढाऊ विमान उडवायचे असून प्रत्येक दिवशी त्याविषयीच्या गोष्टी नव्याने शिकायच्या आहेत’, असे अवनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

वाचा : पाकच्या ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला, हवाई दलातील कॅप्टनला अटक

जून २०१६ पासून घेतले प्रशिक्षण…
भारतीय हवाई दलातील लढाऊ विमान उडवणाऱ्या अवनी या पहिल्या महिला ठरल्या असून, सध्या त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. जून २०१६ मध्ये अवनी आणि भावना कंठ, मोहना सिंह यांना भारतीय हवाई दलाच्या लढाऊ स्क्वाड्रनमध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले होते. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्याद्वारे त्यांना कमिशनमध्ये नेमण्यात आले होते. मिग २१ उडवण्याच्या खडतर प्रशिक्षणानंतरच अवनी यांनी हा इतिहास रचला आहे.