अर्थमंत्री सीतारामन यांच्याकडून बिहारमधील आश्वासनाचे समर्थन

नवी दिल्ली : बिहारमध्ये भाजपप्रणित  राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यास तेथील लोकांना करोनावरील संभाव्य लस मोफत देण्याच्या आश्वासनाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी समर्थन केले असून, या घोषणेने कुठल्याही निकषांचे उल्लंघन झालेले नाही, सत्तेवर आल्यानंतर काय करणार हे सांगण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

सीतारामन यांनी भाजपचा निवडणूक जाहीरनामा गुरुवारी प्रकाशित केला होता, त्या वेळी त्यांनी भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यास बिहारमधील लोकांना मोफत लस देण्याचे आश्वासन दिले होते. विरोधी पक्षांनी या आश्वासनावर टीकेची झोड उठवली होती व निवडणूक आयोगाने भाजपवर कारवाई करावी,अशी मागणी केली होती. सत्ताधारी पक्ष करोना साथीचे राजकारण करीत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे. वार्ताहरांशी बोलताना सीतारामन यांनी सांगितले, की ही निवडणूक जाहीरनाम्यातील घोषणा आहे. कुठलाही पक्ष सत्तेवर आल्यानंतर काय करणार हे सांगू शकतो, तेवढेच आम्ही जाहीर केले आहे. आरोग्य हा राज्यसूचीतील विषय असला तरी आमची घोषणा नियमात बसणारी आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुका २८ ऑक्टोबरपासून तीन टप्प्यांत होत आहेत.

मध्य प्रदेश, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कर्नाटकातही तयारी 

नवी दिल्ली : बिहारमधील निवडणूक जाहीरनाम्यात भाजपप्रणीत एनडीए आघाडीने कोविड १९ प्रतिबंधक लस मोफत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर इतर राज्यांमध्येही मोफत लशीच्या घोषणा करण्याची चढाओढ सुरू झाली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी एका प्रचारसभेत राज्यातील गरिबांना लस मोफत देण्याचे आश्वासन दिले. मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुका होत आहेत.

दरम्यान, तमिळनाडूचे मुख्यमंत्री इ.के.पलानीस्वामी यांनी मोफत लस देण्याचे जाहीर केले असून त्यावर द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टालिन यांनी टीका केली आहे. त्यांनी सांगितले,की ज्या गरिबांच्या नोक ऱ्या  करोना टाळेबंदीमुळे गेल्या त्यांना प्रत्येकी पाच हजाराची मदत सरकारने अजून दिलेली नाही. लस मोफत देणे म्हणजे उपकार नव्हे, ते सरकारचे कर्तव्यच आहे. त्यामुळे लस मोफत देण्याची नाटके रचण्याचे कारण नाही.

पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनीही केंद्राने निधी देवो न देवो, आम्ही मोफत लस देणार असे जाहीर केले. नारायणस्वामी यांनी सांगितले,की करोना हा देवी, पोलिओसारखाच आहे. सरकारने मोफत लस दिलीच पाहिजे. त्यामुळे आम्ही ती देणार आहोत. कर्नाटकचे आरोग्य सचिव पंकजकुमार यांनी सांगितले, की आम्ही राज्यातील लोकांना करोनाची लस मोफत देणार आहोत त्यासाठी नियोजन करण्याचा आदेश राज्याच्या कोविड तज्ज्ञ समितीला दिला आहे. या राज्यांनी लस मोफत देण्याची घोषणा केली असली तरी लस बाजारात येण्यास जानेवारीपर्यंत तरी वाट पाहावी लागेल. तेव्हाही लस बाजारात येईल याची कुठलीही खात्री नाही. कारण लस तयार करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत ही कालहरण करणारी असते.

अमेरिकेत अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांचीही घोषणा

वॉशिंग्टन : आपण अध्यक्षपदी निवडून आलो तर  अमेरिकेतील सर्व नागरिकांना संभाव्य कोविड १९ प्रतिबंधक लस मोफत देऊ, असे आश्वासन डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी  मतदानाला काही दिवस उरले असताना दिले आहे. अमेरिकेत अध्यक्ष ट्रम्प यांनी करोनाची स्थिती हाताळण्यात अनेक चुका केल्याची तक्रार असून करोना हाच निवडणुकीत मुख्य मुद्दा आहे.

डेलावर या त्यांच्या मूळ राज्यात धोरणात्मक भाषणात त्यांनी शुक्रवारी अध्यक्ष ट्रम्प यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, की ट्रम्प यांची करोनाबाबतची धोरणे चुकीची होती, त्यामुळेच २ लाख २० हजार लोकांचा बळी गेला व देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. ट्रम्प यांनी अलीकडेच करोनाबरोबर आपण राहण्यास शिकलो आहोत, असे म्हटले असले तरी माझ्यामते आपण करोनाबरोबर मरण्यास शिकलो आहोत. आता पुढचा हिवाळा हा आणखी काळा कालखंड असणार आहे. आधीच २ लाख २० हजार बळी गेले आहेत. अजून वाईट स्थिती बाकी आहे. कोलंबिया विद्यापीठाने म्हटल्यानुसार करोनाचे १ लाख ३० हजार ते २ लाख १० हजार बळी टाळता आले असते.

बायडेन यांनी सांगितले की, करोनाचा मुकाबला करण्याच्या धोरणात कशी सुधारणा कराल, असा प्रश्न विचारला असता, फारशी सुधारणा करण्यासारखे काही नाही, असे उत्तर ट्रम्प यांनी दिले आहे. आम्ही मात्र प्रशासकीय चुका करणार नाही. आम्ही वेगळा मार्ग निवडून  एकत्र येऊन करोनाचा सामना करू. त्यासाठी राष्ट्रीय धोरण तयार करून विषाणूचा मुकाबला करू, सार्वजनिक आरोग्य व अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी काय करता येईल याचा विचार करून विधेयक तयार करायला सांगू. सर्व राज्यांच्या गव्हर्नरांना मुखपट्टी सक्तीची करायला सांगू.

एकदा सुरक्षित व प्रभावी लस आल्यानंतर सर्व जण करोनातून मुक्त होतील. तुमचा विमा असो नसो, तुम्हाला मोफत लस दिली जाईल. मी निवडून आलो तर मोठय़ा प्रमाणात लस खरेदीचे आदेश देईन व विमा नसलेल्यांनाही लस मोफत दिली जाईल.  आपण आजपर्यंतच्या इतिहासात ज्याला तोंड दिले त्यात कोविडइतके वाईट काहीच नव्हते. करोनाचा विषाणू प्रत्येक राज्यात पसरला असून ४८ लाख रुग्ण झाले.

– जो बायडेन, डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार