केवळ १७ टक्के करोना रुग्णांमध्येच ताप हे लक्षण आढळत असल्याचा नवा अभ्यास आता समोर आला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरच्या इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये नुकताच हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे.

ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्स ट्रॉमा सेंटर, दिल्ली आणि हरयाणातील झज्जर येथील एम्समध्ये हा अभ्यास करण्यात आला आहे. त्यात १४४ करोना रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यातील केवळ १७ टक्के रुग्णांमध्ये ताप हे लक्षण आढणले आहे. जागतिक पातळीवरील अभ्यासाच्या तुलनेत ही टक्केवारी खूप कमी आहे. चीनमध्ये हेच प्रमाण ४४ टक्के होते. म्हणजे चीनमध्ये ४४ टक्के रुग्णांमध्ये ताप हे लक्षण होते. ते प्रमाण भारतात नुकतेच १७ टक्के आढळले आहे, असेही या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे.

या अभ्यास अहवालानुसार, रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एकूण रुग्णांपैकी ४४ टक्के करोना रुग्ण असिम्प्टोमॅटिक आहेत. म्हणजेच त्यांना कोणतीही लक्षणं नाहीत. त्यानंतरही त्यांच्यात फारसी लक्षणं दिसलेली नाहीत.

ताप या लक्षणावरच अधिकाधिक भर देऊन रुग्णतपासणी केली तर इतर असिम्प्टोमॅटिक रुग्णांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे समाजात आणखी करोना संसर्ग पसरू शकतो, असा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे.

काय सांगतो अभ्यास अहवाल?
या नव्या अभ्यासानुसार ४४ टक्के करोना रुग्णांमध्ये करोनाचे कोणत्याही प्रकारचे लक्षणं नव्हती. जे रुग्ण सिम्प्टोमॅटिक होते, म्हणजेच ज्यांना लक्षणं आढळली आहे त्यांच्यात ३४.७ टक्के रुग्णांना कफ होता. १७.४ टक्के रुग्णांना ताप होता तर २ टक्के रुग्णांचं नाकातून सर्दी बाहेर पडत होती.