चारा घोटाळाप्रकरणी लालूप्रसाद यादव हे विरोधकांच्या कट-कारस्थानांना बळी पडले असून सोमवारच्या निकालाविरोधात झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल, असे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
‘आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून न्याययंत्रणेवर आमचा पूर्ण विश्वास आहे’, असे लालूंचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी पत्रकारांना सांगितले. लालूंविरोधात कट-कारस्थानच झाले असून आम्ही त्या विरोधात जनतेच्या न्यायालयातही दाद मागू आणि ज्यांनी हे कट-कारस्थान घडवून आणले आहे, त्यांना येत्या निवडणुकीत चोख प्रत्युत्तरही देऊ, असा इशारा तेजस्वी यादव यांनी दिला.
बिहारच्या माजी मुख्यमंत्री व लालूंच्या पत्नी राबडीदेवी यांनीही आपण लालूंना दोषी मानत नसल्याचे स्पष्ट करून त्यांच्या अनुपस्थितीत आता मुलासमवेत पक्ष चालवू, असे पाटणा येथे सांगितले. या निकालानंतर राबडीदेवी पाटण्यातील आपल्या निवासस्थानी घरीच बसून राहिल्या होत्या. आम्ही ‘जनता की अदालत’मध्येच जाऊन लालूंसाठी न्याय मागू, असे त्या म्हणाल्या.
विरोधी पक्षांच्या कारस्थानांना आपला पती बळी पडला असल्याचा आरोप राबडीदेवी यांनी केला. मात्र हे कारस्थान कोणी रचले त्यांचे नाव घेण्याचे टाळत ते प्रत्येकास ठाऊक असल्याचे त्या म्हणाल्या. नितीशकुमार आणि शिवानंद तिवारी यांच्यासारखे नेते भ्रष्टाचारात अडकलेले असतानाही सत्तेत आहेत, असा टोमणाही त्यांनी मारला.
‘आजारी’ जगन्नाथ मिश्रा रुग्णालयात
रांची : चारा घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आल्यानंतर लगेचच ‘प्रकृती बिघडल्याची’ कथित सबब देत ‘उपचार’ करून घेण्यासाठी रुग्णालयात दाखल होऊन बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनी आपला तुरुंगवास काही काळ तरी लांबणीवर टाकला.
राजेंद्र इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे संचालक तुलसी महातो यांनी मिश्रा हे रुग्णालयात दाखल झाल्याच्या माहितीस दुजोरा दिला. मात्र त्यांच्या ‘आजारा’चे नेमके स्वरूप सांगण्याचे महातो यांनी टाळले. ७६ वर्षीय मिश्रा यांना बिरसा मुंडा मध्यवर्ती तुरुंगात नेण्यात आल्यानंतर लगेचच आपली ‘प्रकृती बिघडल्याची’ तक्रार केली, असे पोलीस महासंचालक शैलेंद्र सिंग यांनी सांगितले.