चारा घोटाळ्यात दोषी ठरलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव हे गुरुवारी सीबीआयच्या विशेष न्यायालयासमोर हजर झाले. ‘मी हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करत आहे. मी आजारी आहे, पण तरीही मी न्यायालयात हजर झालो’, असे त्यांनी न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांना सांगितले.

गेल्या आठवड्यात राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यात हंगामी जामिनाचा कालावधी वाढवून देण्यास झारखंड हायकोर्टाने नकार दिला होता. हायकोर्टाने लालूप्रसाद यादव यांना ३० ऑगस्टपर्यंत सीबीआय न्यायालयासमोर हजेरी लावण्यास सांगितले होते. लालूप्रसाद यादव यांच्यावर वैद्यकीय उपचार करायचे असून हंगामी जामिनाचा कालावधी तीन महिने वाढवून देण्यात यावा, अशी मागणी लालूंच्या वकिलांनी केली होती. मात्र, हायकोर्टाने लालूंची ही मागणी फेटाळून लावली होती. लालूप्रसाद यांना राज्य सरकारने वैद्यकीय तपासणी सेवा पुरवावी असे आदेश हायकोर्टाने दिले होते. अखेर हायकोर्टाच्या आदेशानुसार गुरुवारी दुपारी लालूप्रसाद यादव सीबीआय विशेष न्यायालयात हजर झाले.

लालूप्रसाद यादव हे चारा घोटाळ्यातील चार प्रकरणांमध्ये दोषी ठरले आहेत. लालूप्रसाद यादव यांना ११ मे रोजी जामीन मंजूर झाला होता. सुरुवातीला सहा आठवड्यांसाठी जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर तो वाढवून देण्यात आला.