चारा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आज होणारी शिक्षेची सुनावणी उद्यावर ढकलली आहे. न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांच्यासह १६ जणांना याप्रकरणी दोषी ठरवले आहे. वकील विंदेश्वरी प्रसाद यांच्या निधनामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. तर दुसरीकडे न्यायालयाने याप्रकरणी तेजस्वी यादव, रघुवंशप्रसाद सिंह, शिवानंद तिवारी आणि मनीष तिवारी यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वक्तव्ये केल्याप्रकरणी ही नोटीस बजावल्याचे न्यायालयाने सांगितले.
Lalu Yadav leaves from Ranchi Special CBI Court for Birsa Munda jail; quantum of sentenced will now be pronounced tomorrow #FodderScam pic.twitter.com/pXaEdV4Yk3
— ANI (@ANI) January 3, 2018
दि. २३ डिसेंबरला देवघर कोषागारमधून अवैधरित्या पैसे काढल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले होते. रांची येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने याप्रकरणी बिहारचे आणखी एक माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रांशिवाय माजी मंत्री विद्यासागर निषाद आणि पीएसीचे तत्कालीन अध्यक्ष ध्रुव भगत, हार्दिकचंद्र चौधरी, सरस्वतीचंद्र आणि साधना सिंह यांची निर्दोष मुक्तता केली होती.
न्यायालयाने लालूंसहित १६ जणांना दोषी ठरवले होते. या १६ जणांना ताब्यात घेऊन बिरसा मुंडा तुरूंगात पाठवण्यात आले होते. न्यायालयाने ९५० कोटी रूपयांच्या चारा घोटाळ्याशी निगडीत देवघर कोषागारमधून ८९ लाख २७ हजार रूपये अवैधरित्या काढल्याप्रकरणी हा निर्णय दिला होता. याप्रकरणी एकूण ३८ जणांना आरोपी ठरवण्यात आले होते. यातील ११ जणांचा मृत्यू झाला.तिघे सीबीआयचे साक्षीदार झाले. तर दोघांनी आपला गुन्हा कबूल केला होता. त्यामुळे त्यांना २००६-०७ मध्येच शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर २२ आरोपी राहिले होते. याप्रकरणात तीन आयएएस अधिकारी फुलचंद सिंह, बेक ज्युलियस आणि महेश प्रसाद हेही आरेापी होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 3, 2018 12:44 pm