राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या अडचणी वाढल्या आहेत. देशातील चारा घोटाळा प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. लालूप्रसाद यादव यांच्यासह  सगळ्या दोषी आरोपींना ३ जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे. सोमवारपासून न्यायलयाला ख्रिसमसनिमित्त सुट्टी असल्यामुळे न्यायलायचे कामकाज २ जानेवारीला सुरू होईल. त्यानंतर ३ जानेवारीला लालूप्रसाद यादव यांच्यासह चारा घोटाळ्यात शिक्षा सुनावली जाणार आहे. काही वेळापूर्वीच पोलिसांनी लालूप्रसाद यादव यांना रांची तुरुंगात घेऊन जाण्यासाठी ताब्यात घेतले आहे.

लालूप्रसाद यादव यांच्यासह दोषींना ३ जानेवारीला शिक्षा सुनावली जाणार आहे. मात्र तोपर्यंत लालूप्रसाद यादव यांचा मुक्काम तुरुंगातच असणार आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे लालूप्रसाद यादव यांचे नवे वर्ष तुरुंगातच जाणार आहे.  कोट्यवधी रूपयांचा चारा घोटाळा देशभरात चांगलाच गाजला होता. त्यामुळे लालूप्रसाद यादव यांना गमवावे लागले होते. चारा घोटाळा प्रकरणात जगन्नाथ मिश्रा यांच्यासह एकूण ६ जणांना दोषमुक्त करण्यात आले आहे.

लालूप्रसाद यादव यांना या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवले जात आहे अशी टीका राजदचे नेते मनोज झा यांनी केली आहे. आमचा न्यायव्यवस्थेवर अजूनही पूर्ण विश्वास आहे. आम्ही यापेक्षा वरच्या कोर्टात दाद मागू असेही झा यांनी स्पष्ट केले.चारा घोटाळा प्रकरणात लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर बिहारमध्ये राजकारण तापले आहे. विरोधी पक्षांनी आम्हाला या प्रकरणात गोवले असल्याचा आरोप राजदने केला. तर लालूप्रसाद यादव यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप जदयूने केला आहे.