“चीनला जशास तसे उत्तर देण्याची गरज असून आम्ही योगाच्या माध्यमांतून शांततेबाबत बोलत आहोत. मात्र, एखाद्याला जर ही भाषा कळत नसेल तर त्याला युद्धाच्या भाषेतच उत्तर द्यायला हवे असे”, असे योगगुरू रामदेव बाबा यांनी म्हटले आहे. मुंबईत जागतिक शांती आणि एकता परिषदेत ते बोलत होते.

चीन वारंवार भारताला युद्धाची धमकी देत आहे. भारताला चुचकारण्याची संधी तो सोडत नसल्याची सध्या स्थिती आहे. मात्र, स्वतःहून युद्धाला आमंत्रण देणार नाही, अशी आपली भुमिका असल्याचे भारताकडून अनेकदा स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रामदेव बाबा यांनी या कार्यक्रमात आपली भुमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “चीनचा शांततेवर विश्वास नाही, त्यांचा शांतता राखण्याचा हेतू असता तर दलाई लामा यांना वारंवार भारतात येण्याची गरजच पडली नसती”.

“भीती, चीडचीड निर्माण करते, चीडचीड, रागाला जन्म देते आणि राग, शेवटी हिंसा घडवून आणतो”, अशा नेमक्या शब्दांत या यावेळी तिबेटचे सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांनी चीनच्या वृत्तीवर भाष्य केले.

डोक्लाम प्रश्नावरुन निर्माण झालेला तणाव संपुष्टात आणण्यासाठी भारताकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, भारताकडून शांततेच्या मार्गाने तणाव निवळण्याचे प्रयत्न सुरु असताना चीनने पुन्हा युद्धाची भाषा केली आहे. ‘भारत आणि चीनच्या लष्करातील संघर्षाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे,’ अशा शब्दांमध्ये चिनी सरकारचे वृत्तपत्र असलेल्या ‘चायना डेली’ने भारताला पुन्हा धमकी दिल्याचे वृत्त नकतेच प्रसिद्ध झाले आहे. भारताने सीमेवरील परिस्थिती सुधारण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावेत, असाही सल्ला या वृत्तपत्राने दिला होता.

भारताकडून अद्याप तणाव निवळण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याने शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवण्याच्या शक्यता मावळत आहेत,’ असेदेखील या लेखात नमूद करण्यात आले आहे. भारताने डोक्लाममध्ये तैनात असणारे सैन्य कोणत्याही अटीविना मागे घ्यावे. यामुळे डोक्लाममधील स्थिती पूर्ववत होईल,’ असेही चिनी वृत्तपत्राने लेखात म्हटले होते.