केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमधील बांकुडा जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांनी एका आदिवासी कुटुंबाच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला. आदिवासी कुटुंबाच्या घरी अमित शाह जेवत असल्याचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले होते. मात्र आता याचवरुन राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा सर्व प्रकार म्हणजे केवळ एक नाटक असल्याचा आरोप करत भाजपावर निशाणा साधला आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ममता बॅनर्जी यांनी बांकुडा जिल्ह्यात आदिवासी कुटुंबाच्या घरी अमित शाह यांनी पाहुणचार घेणं हे केवळ नाटक होतं. अमित शाह यांच्यासाठी बनवलेलं जेवण हे फाइव्ह स्टार हॉटेलमधून मागवण्यात आलं होतं. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार ममता यांनी हे पदार्थ ब्राह्मण आचाऱ्याकडून बनवून घेण्यात आल्याचाही दावा केला.

पश्चिम बंगालमध्ये पुढील सहा महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच आता बिहारमधील विजयानंतर भाजपाने आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळवला आहे. भाजपाने आतापासून पश्चिम बंगालमधील निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. याच निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री दोन दिवसांचा पश्चिम बंगाल दौऱ्यावर जाऊन आले. बांकुडा जिल्ह्यात आदिवासींची लोकसंख्या अधिक आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजापाला येथे यश मिळालं होतं.

अमित शाह हे ५ नोव्हेंबर रोजी बांकुडामध्ये पोहचले तेव्हा त्यांनी आदिवासी कुटुंबाच्या घरी जेवण केलं. जमीनवर पंगतीमध्ये बसून जेवतानाचा अमित शाह यांचे फोटो सोशल नेटवर्किंगवर पाहायला मिळाले. चतुर्दिही गावामध्ये राहणाऱ्चया विभीषण हंसदा यांच्या घरी शाह यांनी केळीच्या पानावर शाकाहारी जेवणाचा आनंद घेतला. जे फोटो समोर आले त्यामध्ये अमित शाह यांनी वरण, भात, पोळी आणि भाज्यांचा आस्वाद घेतल्याचे पहायला मिळाले. यावेळी अमित शाह यांच्यासोबत त्यावेळी पक्षाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय तसेच प्रदेशाध्यक्ष दिलीप घोषही होते. यावेळी या सर्व नेत्यांनी येथील स्थानिकांसाठी कोणत्या योजना राबवल्या जाऊ शकतात यासंदर्भात चर्चा केल्या.

आणखी वाचा- “३० हजार रोहिंग्यांची मतदार यादीत नोंद झाली तेव्हा अमित शाह झोपा काढत होते का?”

बांकुडा येथील खटरा येथे एका सरकारी कार्यक्रमामध्ये ममता यांनी भाजपाने आयोजित केलेला हा भोजानाचा कार्यक्रम हा दिखाव्यासाठी होता असं म्हटलं आहे. “समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये दलित कुटुंबातील सदस्य हे कोबी आणि कोथिंबीर कापताना दिसत होते. मात्र ते फोटोंमधील ताटात कुठेच दिसून आलं नाही. अमित शाह यांनी बासमती भात, पोस्टा बोरा खाल्लं,” असा दावाही ममतांनी केला आहे.

शाह यांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याऐवजी दुसऱ्या पुतळ्याला हार घातला. नंतर हा पुतळा एका शिकाऱ्याचे असल्याचे समोर आलं होतं, अशी आठवण ममतांनी स्थानिकांना करुन दिली. आम्ही या ठिकाणी आम्ही बिरसा मुंडा यांचा पुतळा उभारणार असून बिरसा मुंडांच्या जयंतीनिमित्त पुढच्या वर्षीपासून १५ नोव्हेंबरला सुट्टी घोषित करणार आहोत, अशी घोषणाही ममतांनी केली.