संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पॅरिसमध्ये ‘राफेल’च्या केलेल्या पुजनास काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी ‘तमाशा’ असे संबोधल्यानंतर आता खर्गेंसह काँग्रेसवर भाजपाकडून पलटवार करण्यात आला आहे. ”क्वात्रोचीला पुजणाऱ्या पक्षासाठी, शस्त्रपूजा ही अडचणच असणार” असे भाजपाने म्हटले आहे. याबाबत भाजपाकडून ट्विटरद्वारे प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

”काँग्रेसला हवाई दलाचे आधुनिकीकरण व भारतीय परंपरांचा त्रास होतो. जो पक्ष क्वात्रोचीची पूजा करतो त्याच्यासाठी स्वाभाविकच शस्त्रपूजा ही अडचण असणार, खर्गेजी आम्हाला बोफर्स घोटाळ्याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद” असे भाजपाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

बोफोर्स घोटाळ्यातील आरोपी इटालीयन उद्योगपती ओट्टाविओ क्वात्रोचीला युपीए सरकारने पाठिशी घातल्याचा आरोप करण्यात आला होता.  केंद्रीय अन्वेषण विभागाच्या  (सीबीआयच्या) एका अहवालातून असे समोरही आले होते.

या अगोदर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरूपम यांनी काँग्रेसला घरचा आहेर देत, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या या विधानावर टीका केली होती. शस्त्रपूजा कधी तमाशा होऊ शकत नाही. देशात याची फार जुनी परंपरा आहे. मात्र अडचण अशी आहे की खर्गेजी हे नास्तिक आहेत, पण काँग्रेस पक्षातील सर्वचजण काही नास्तिक नाहीत, असे निरूपम यांनी म्हटले होते.

तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या राफेलच्या पुजनानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी अशा प्रकारच्या तमाशाची गरज नाही. जेव्हा आम्ही बोफोर्स तोफ भारतात आणली होती, तेव्हा अशा प्रकारचा दिखावा केला नव्हता असे म्हटले होते.