अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन विराजमान होणार हे शनिवारी रात्रीच स्पष्ट झालं आहे. बहुमत मिळवत जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. विजयी झाल्यानंतर जो बायडन यांनी पहिल्यांदाच अमेरिकेच्या जनतेला संबोधित केलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनाही त्यांनी साद घातली. “राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मतं दिली होती त्यांची निराशा झाली असणार हे मी समजू शकतो. आता एकमेकांना संधी देऊयात. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं आपण आता थांबवलं पाहिजे. आपण एकमेकांनी नव्या दृष्टीकोनातून एकमेकांकडे पाहिलं पाहिजे” असं आवाहन जो बायडन यांनी केलं आहे.

अमेरिकेच्या जनतेने मला विजयी केले आहे. अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्षपदासाठी भरघोस मतदान झालं. त्यामुळे आपला विजय हा निर्भेळ आहे. मी अमेरिकेचा अध्यक्ष या नात्याने तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की मी विभाजनाचे राजकारण करणार नाही. एकात्मतेसाठी प्रयत्न करेन. मला रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅट्स अशी वेगळी राज्यं दिसत नाहीत. तर फक्त एकसंध अमेरिकाच दिसते आहे असंही बायडन यांनी सांगितलं.

मतमोजणीनंतर जो बायडन विजयी झाल्याचं समजताच डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पुन्हा एकदा मतमोजणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ज्या लोकांनी कधीही मेल बॅलेट्स मागितलेच नव्हते त्यांच्याकडेही बॅलेट्स पाठवण्यात आले असाही आरोप ट्रम्प यांनी केला आहे.