टीम इंडियाचा सर्वांधिक यशस्वी कर्णधार असणाऱ्या महेंद्र सिंह धोनीचा आज वाढदिवस असून या खास दिवसासाठी त्याला टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे सेहवागच्या फॉलोवर्सने त्याचा हा शुभेच्छा संदेश तब्बल २ तासात २८०० वेळा रिटि्वट केला आहे.

“आपल्या चाहत्यांना ज्याने अनेक आनंदाचे क्षण दिले अशा महेंद्र सिंह धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. हे हेलिकॉप्टर सतत उडत रहायला हवे आणि आपल्या ह्रदयात त्याचे लॅण्डिग व्हावे” अशा भावपूर्ण शब्दांत सेहवागने या शुभेच्छा दिल्या आहेत. सेहवागच्या या ट्विटला मिळालेला प्रतिसाद पाहता सेहवागने जणू चाहत्यांच्या मनातीलच गोष्ट त्याने बोलून दाखवली आहे.

त्याचबरोबर दुसरीकडे धोनीचा सध्याचा सहकारी असलेल्या युवराज सिंहने ही धोनीला इंस्टाग्रामवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. युवीने धोनीसोबतचा आपला फोटो शेअर करत “मिस्टर हेलिकॉप्टरला वाढदिवसाच्या शुभेच्छा” केक तुझी वाट पाहत आहे, असे त्याने फोटो कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
सेहवाग आणि युवराज हे दोघेही २०११ मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय किक्रेट वर्ल्ड कपच्या विजेत्या संघाचे सदस्य होते. या विजयी संघाचे नेतृत्व धोनीने केले होते. भारताने हा वर्ल्ड कप तब्बल २८ वर्षांनंतर जिंकला होता. धोनी सध्या टीम इंडियासोबत वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असून यामध्ये ५ वनडे आणि टी ट्वेन्टी मॅचेस होणार आहेत.