मुंबईतील डोंगरी येथील इमारत दुर्घटनाप्रकरणी संबंधीत अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. ही घटना सरकारच्या नाकर्तेपणामुळे घडली आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.

अशा धोकादायक इमारतींचा सर्व्हे करण्याची जबाबदारी रिपेअर बोर्डाची होती. धोकादायक होत्या तर तेथील लोकांचे पुनर्वसन का करण्यात आले नाही? असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच रिपेअर बोर्डाला जनता उपकर देत आहे. त्यामुळे दुरुस्ती व पुनर्बांधणीची जबाबदारी त्यांची आहे. तरीही ही घटना घडते म्हणजे रिपेअर बोर्डाचा नाकर्तेपणा समोर आला आहे. त्यांच्यावर कुणाचा वचक राहिलेला नाही असा आरोपही त्यांनी केला.

मुंबईत वारंवार अशा घटना घडत आहेत. कधी आगीमध्ये लोकांचा जीव जातोय तर कधी पूल कोसळून लोक मरताहेत. तर काही ठिकाणी पाण्यात बुडून लोकांचा मृत्यू होत आहे. अशा घटनांमध्ये कोणावरही जबाबदारी निश्चित होत नाही, त्यामुळे या दुर्घटना थांबत नाहीत असेही मलिक यांनी म्हटले आहे.

जोपर्यंत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही आणि अधिकार्‍यांना दंड होत नाही तोपर्यंत कोणीही जबाबदारीने काम करणार नाही आणि या घटना थांबणार नाहीत असेही मलिक यावेळी म्हणाले.