पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे थांबवले नाही किंवा त्यांच्या कुरापतींवर नियंत्रण आणले नाही तर भारतीय सैनिक त्यांच्या प्रत्येक गोळीला १० गोळ्यांनी उत्तर देतील अशी गर्जना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली आहे. नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानचे सैन्य शस्त्रसंधीचे उल्लंघन करते. तसेच पाकिस्तानच्या कुरापतीही सुरुच आहेत. तुम्ही एक गोळी चालवलीत तर आता १० गोळ्यांनी उत्तर मिळेल हे लक्षात ठेवा असे आता अहीर यांनी सुनावले आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

पाकिस्तान हा दहशतवाद्यांचे नंदनवन असलेला देश आहे. ते दहशतवादी भारतात येऊन विविध कारवाया करत असतात. जवानांवर हल्ले करत असतात, सुरक्षा दलांवर, पोलिसांवर हल्ले करत असतात. तसेच शस्त्रसंधीला उत्तर देतानाही सीमेवर जवान मारले जातात. मात्र हे यापुढे मुळीच खपवून घेतले जाणार नाही. आता पाकिस्तानच्या एका गोळीला भारतीय सैनिक दहा गोळ्यांनी उत्तर देतील.

भारतीय जवान देशाच्या सीमेवर उभे राहून देशाचे रक्षण करत असतात. पाकिस्तानने मात्र त्यांचे नापाक इरादे बदललेले नाहीत. काही दिवसांपूर्वीच नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याने ११ नागरिक जखमी झाले होते. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनीही गोळीबार केला… पाकिस्तानने जर अशाप्रकारे छुपे हल्ले करत कुरापती सुरु ठेवल्या तर भारत शांततेचे धोरण स्वीकारणार नाही असेही अहीर यांनी खडसावले आहे.

काही दिवसांपूर्वीच लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी पाकिस्तान अण्वस्त्र हल्ल्याच्या पोकळ धमक्या देतो आहे त्यांनी त्यांचे वर्तन सुधारावे अन्यथा आम्हाला जशास तसे उत्तर द्यावे लागेल असा इशारा दिला होता. ज्यानंतर पाकिस्तानने या वक्तव्याचा समाचार घेत हवे तर भारताने अण्वस्त्र हल्ल्याचा अनुभव घ्यावा आम्ही पोकळ धमक्या देत नाही असे म्हटले होते. तरीही आर्मी डे चे औचित्य साधत पाकिस्तानने त्यांच्या कारवाया थांबवल्या नाहीत तर आम्ही त्यांना सुतासारखे सरळ करू असा इशारा दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा हंसराज अहीर यांनी पाकिस्तानला नुसते जशास तसे नाही तर एका गोळीला १० गोळ्यांनी उत्तर देऊ असे सुनावले आहे.