तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दोन्ही नेत्यांमध्ये सोमवारी तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेसंबंधी चर्चा झाली. चंद्रशेखर राव आणि ममता बॅनर्जी या दोन्ही प्रादेशिक नेत्यांचा बिगर काँग्रेस, बिगर भाजपा आघाडी स्थापन करण्याकडे कल आहे. २०१९ पूर्वी आणखी एका आघाडीचा पर्याय हवा असा लोक विचार करत आहेत. ही तिसरी आघाडी देशातील जनतेसाठी असेल. ही फक्त विविध राजकीय पक्षाची आघाडी नसेल. देशाला आणखी एका राजकीय पर्यायाची गरज आहे असे चंद्रशेखर राव म्हणाले.

कोलकात्तामध्ये सचिवालयात ममता बॅनर्जी आणि के. चंद्रशेखर राव यांच्यामध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. सध्याचे राजकीय चित्र बदलणे हे समविचारी पक्षांचे ध्येय असेल. या आघाडीचे नेतृत्व कोण करणार ? या महत्वाच्या प्रश्नावर राव म्हणाले कि, हे सामूहिक नेतृत्व असेल. आम्ही अन्य पक्षांबरोबर चर्चा सुरु केली आहे. आम्हाला पाठिंबा मिळेल असी अपेक्षा आहे. तिसरी आघाडी मजबूत असली पाहिजे असे ममता म्हणाल्या.

देशावर एकाच पक्षाची सत्ता असू नये असे ममता म्हणाल्या. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत तिसरी आघाडी काँग्रेसचा बाहेरुन पाठिंबा घेणार का ? या प्रश्नावर राव म्हणाले कि, तुम्ही नेहमीसारख्या राजकीय मॉडेलचा विचार करत आहात. आमचा जो प्रस्ताव आहे तो पूर्णपणे वेगळा आणि भिन्न आहे. लोकांच्या इच्छा, अपेक्षा हाच आमचा कार्यक्रम असेल असे ते म्हणाले.