19 December 2018

News Flash

Sukhoi Su-30MKI सुखोई विमानातून पहिल्यांदाच डागले जाणार ब्राह्मोस

बंगालच्या उपसागरात चाचणी होणार

सुखोई-३० एमकेआय (संग्रहित छायाचित्र)

शत्रू सैन्याच्या सीमेत घुसून लक्ष्य भेदण्याची क्षमता असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी आता सुखोई या लढाऊ विमानातून घेतली जाणार आहे. आवाजाच्या तिप्पट वेगाने मारा करण्यात सक्षम असणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी याआधी कधीही लढाऊ विमानातून करण्यात आलेली नाही. मात्र या आठवड्यात ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी सुखोई-३० एमकेआय विमानातून केली जाणार आहे. यामुळे भारताच्या युद्ध सज्जतेत वाढ होणार आहे. बंगालच्या उपसागरात दोन इंजिन असलेल्या सुखोई विमानाच्या Sukhoi Fighter मदतीने २.४ टन किलो वजनाच्या ब्राह्मोसची चाचणी घेण्यात येईल.

लढाऊ विमानातून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात येत असल्याने मारक क्षमतेत दुपटीने वाढ होणार आहे. हवेतून जमिनीवर मारा करण्यात सक्षम असणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र शत्रू राष्ट्रात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीखालील अण्वस्त्रांचे बंकर्स, कमांड आणि कंट्रोल सेंटर्स आणि समुद्रावरुन उडणारी विमाने यांना लक्ष्य करण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे. त्यामुळे शत्रू राष्ट्रावर वचक ठेवण्यात ब्राह्मोस महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. लष्कराने गेल्या दशकात २९० किलोमीटरपर्यंत मारक क्षमता असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचा समावेश स्वत:च्या ताफ्यात केला आहे. याशिवाय ब्राह्मोस क्षेपणास्त्रासाठी २७ हजार १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लष्करासह, नौदल आणि हवाई दलानेदेखील ब्राह्मोस क्षेपणास्त्र आपल्या ताफ्यात दाखल करण्यात रस दाखवला आहे.

जून २०१६ मध्ये भारताचा समावेश क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण संघटनेत (एमटीसीआर) झाला. यामध्ये एकूण ३४ देशांचा समावेश आहे. भारत एमटीसीआरचा भाग झाल्याने क्षेपणास्त्रांच्या पल्ल्याची मर्यादा संपुष्टात आली आहे. त्यामुळेच आता ४५० किलोमीटरची मारक क्षमता असलेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची तयारी भारताने सुरु केली आहे. एमटीसीआरची सदस्यता मिळाल्यानंतर भारताला ३०० किलोमीटरची मारक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यासाठी हिरवा कंदिल मिळाला. सध्या ब्राह्मोसचे हायपरसॉनिक वर्जन तयार करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. या क्षेपणास्त्राचा वेग आवाजाच्या वेगाच्या पाचपट असेल.

First Published on November 14, 2017 10:25 am

Web Title: for first time brahmos missile to be tested from sukhoi fighter jet
टॅग Sukhoi