पश्चिम बंगालच्या बर्धमान जिल्ह्यातील भाटार भागातून घरांची जाळपोळ केल्या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अरींदम भट्टाचार्य असे या आरोपीचे नाव असून त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मजा येते, आनंद मिळतो म्हणून अरींदम लोकांच्या घरांना आगी लावायचा. पेशाने शेतकरी असलेल्या अरींदमने आतापर्यंत परिसरातील एकूण सात घरे पेटवून दिली आहेत.

घराला आग लावल्यानंतर ती विझवण्यासाठी अरींदमच पाण्याची बादली घेऊन सर्वात पहिला तिथे पोहोचलेला असायचा. या प्रकाराने तपास करणारे पोलिसही चक्रावून गेले आहेत. सुरुवातीला यावर विश्वास ठेवणे आमच्यासाठी सुद्धा कठिण गेले. फक्त छंद म्हणून कोण कशी काय दुसऱ्याच्या घराला आग लावू शकतो ? पण आरोपीने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली आहे असे पोलीस अधिकारी प्रियाब्राता रॉय यांनी सांगितले.

कुठल्याही माणसामध्ये बदल्याच्या भावनेतून अशी प्रवृत्ती निर्माण होते. काही लोकांना रक्त पाहायला आवडते तसेच त्याला आग पाहायला आवडत असावी असे मानसोपचार तज्ञ सुजाता दास यांनी सांगितले. आरोपी अरींदम म्हणाला कि, मला कुठलाही मानसिक आजार नाहीय. मी आधी काहीही न करता लोक माझ्यावर विनाकारण आरोप करायचे. त्यामुळे मी अशी कृत्ये सुरु केली. मी काही घरे पेटवून दिली अशी कबुली आरोपीने दिली. २९ ऑगस्टला अरींदमने गाईच्या गोठयाला आग लावली. अरींदम गाईच्या गोठयाच्या मागच्या बाजूला उभा होता असे गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.