दक्षिण हिंदी महासागरातून सुटका करण्यात आलेले भारतीय नौदलाचे कमांडर अभिलाष टॉमी यांच्यावर सध्या हिंदी महासागरातील एका दुर्मिळ बेटावर उपचार सुरु आहेत. लवकरच त्यांना पुढील उपचारासाठी मॉरिशेसला पाठवण्यात येणार आहे. भारतीय नौदलाच्या आयएनएस सातपूडा या युद्धजहाजावरुन टॉमी यांना पुढील उपचारासाठी मॉरिशेसला हलवण्यात येईल. गुरुवारपर्यंत हे जहाज पोहोचण्याची शक्यता आहे. अॅमस्टरडॅमला हे जहाज उद्यापर्यंत पोहोचेल असे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान सुटका झाल्यानंतरचे टॉमींचे फोटो आता समोर आले आहेत. समुद्र त्यादिवशी प्रचंड खवळलेला होता. मी आणि माझी थुरिया बोट निसर्गा विरुद्ध लढत होतो. माझ्यातल्या नौकानयनाच्या कौशल्यामुळे मी बचावलो. एक सैनिक आणि नौदलाचे प्रशिक्षण यामुळे मी या संकटावर मात करु शकलो असे अभिलाष टॉमी यांनी म्हटले आहे. भारतीय नौदल आणि सुटका करणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.

गोल्डन ग्लोब रेस-२०१८ या आंतरराष्ट्रीय नौकानयन स्पर्धेदरम्यान अभिलाष टॉमी जखमी झाले होते. दक्षिण हिंदी महासागरात वादळ आणि खवळलेल्या समुद्रामुळे टॉमी यांच्या थुरिया या स्वदेशी बनावटीच्या नौकेचे नुकसान झाले व टॉमी जखमी झाले. सोमवारी त्यांची फ्रान्सच्या ओसीरीस बोटीने सुटका केली.
भारतीय नौदलाच्या टेहळणी विमानाने त्यांची नौका शोधून काढली होती. नौदलाचे पी८ आय विमान जेव्हा थुरिया बोटीवरुन जात होते त्यावेळी टॉमी यांनी इपीआयआरबी उपकरणाद्वारे पिंग करुन प्रतिसाद दिला होता. यााधी फ्रेंच नौका ओसीरीस पुढच्या १६ तासात टॉमी यांच्यापर्यंत पोहोचेल असे भारतीय नौदलाकडून सांगण्यात आले होते.