न्यायालयात विविध खटल्यांवर महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या आणि न्यायदानाचं महत्त्वाचं काम करणाऱ्या न्यायाधीश के.एम.जोसेफ यांनी नुकतच गायक म्हणून सर्वांसमोर येत एक नवी सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून, ‘हम होंगे कामयाब’ असं म्हणत केरळच्या पूरग्रस्तांच्या आत्मविश्वाला दुप्पट करणारं हे गाणं गात खुद्द न्यायाधीशच व्यासपीठावर आल्याचं पाहून त्या कार्यक्रमाच्या उपस्थितांनाही धक्काच बसला.

केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या क्षेत्रातील बातम्यांसाठी काम करणाऱ्या काही पत्रकारांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्याचवेळी के.एम.जोसेफ आणि कुरियन जोसेफ यांच्यात दडलेला कलाकार पाहायला मिळाला. त्यांनी अभिनेता ममूथीची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या ‘अमाराम’ या मल्याळम चित्रपटातील गीत गायलं. त्या चित्रपटात ममूथीने मासेमाराची भूमिका साकारली होती.

सर्वांसमोर गाण्यासाठी आपण याच गाण्याची निवड का केली याचा उलगडा करत जोसेफ म्हणाले, ‘मी हे गाणं निवडण्यामागचं कारण म्हणजे, ज्यावेळी केरळ राज्यावर पूराचं संकट ओढवलं होतं. तेव्हा सैन्यदलापूर्वी इथे सर्वांच्याच मदतीला धावला तो म्हणजे स्थानिक मासेमार वर्ग. आपल्या मासेमारीच्या बोटी त्यांनी पूराच्या पाण्यात उतरवल्या आणि अनेकांनाच मदत केली. माणुसकीच्या नात्यात असणाऱ्या सच्चेपणाचच या गाण्यातून दर्शन घडतं.’

वाचा : Kerala Floods BLOG : ओणमच्या निमित्ताने साजरा होणार उत्सव माणुसकीचा, माणसातल्या देवाचा

सर्वप्रथम न्यायाधी कुरियन जोसेफ यांनी दुरध्वनीवरुन संपर्क साधत के.एम.जोसेफ यांना मल्याळम आणि हिंदी गाणं गाण्याची विनंती केली होती. पण, गाण्याचा दूरदूरपर्यंत विचारही न करणाऱ्या के.एम. जोसेफ यांनी मात्र या साऱ्याला नकार दिला. पण, कुरियन जोसेफ यांच्या आग्रहाखातर अखेर त्यांनी गाणं सादर केलं.

‘इंडियन सोसायटी फॉर इंटरनॅशनल लॉ’, सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पार्श्वगायक मोहित चौहान याचीही उपस्थिती होती. पण, खऱ्या अर्थाने या दोन न्यायाधीशांनी आणि त्यांच्या गायनशैलीनेच उपस्थितांची दाद मिळवली हे खरं.