देशभरात होणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या नियमावलीत अमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय सेवेत अधिकारी पदावर रुजू होताना विद्यार्थ्याला परीक्षेत मिळालेले गुण हा एकमेव मापदंड नसेल. लाल बहाद्दूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन येथे आयोजित केल्या जाणाऱ्या १५ आठवड्यांच्या फाऊंडेशन कोर्समधील कामगिरी आता ग्राह्य धरली जाणार आहे. याठिकाणी केलेल्या कामगिरीवरुन अधिकाऱ्याला त्याचे केडर दिले जाणार आहे. सध्याच्या पद्धतीनुसार सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवाराला आयएएस, आयपीएस, आयएफएस या सेवा निवडण्याची मुभा होती. मात्र आता त्यामध्ये बदल होणार आहे. देशाच्या नव्या आयएएस अधिकाऱ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा ट्रेनिंगमध्ये व्यवहारिक ज्ञानही मिळावं यासाठी हा बदल केला जाणार आहे. राजकीय यंत्रणा आणि त्याचा प्रशासनावरील प्रभाव समजावा, यासाठी मोदी सरकारने सध्याच्या यंत्रणेमध्ये बदल करण्याचे ठरवले आहे.

नव्या नियमांनुसार, ट्रेनिंगनंतरच कोणाला कोणती सेवा आणि कोणत्या राज्याचं केडर मिळणार हे ठरणार आहे. ट्रेनिंगमध्ये मिळालेले गुण यूपीएससीच्या अंतिम निकालात जमा होतील, त्यानंतर त्यांचा रँक ठरेल. तुम्हाला मुख्य परीक्षेतील गुणांमुळे आएएस पद मिळाले असेल तरीही ट्रेनिंगमधील सुमार कामगिरीमुळे आयएएस केडर मिळू शकणार नाही, तर त्याच्यापेक्षा कमी रँक असलेल्या उमेदवाराने ट्रेनिंगमध्ये चांगली कामगिरी केली तर तो आयएएस बनू शकतो. त्यामुळे आता प्रशासकीय अधिकारी पदासाठी पुस्तकी ज्ञानासह व्यावहारीक ज्ञानही तपासलं जाणार आहे.