देशात वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटी लागू होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त नुकतेच मुख्य आर्थिक सल्लागारपदाचा राजीनामा दिलेले अरविंद सुब्रमण्यम यांनी एक महत्वाची सूचना केली आहे. ही सूचना व्यापाऱ्यांना दिलासा देणारी ठरू शकते. जीएसटी काही प्रमाणात सुटसुटीत करणे आवश्यक असून यासाठी सर्वप्रथम २८ टक्क्यांची कररचना संपुष्टात आणावी लागेल तसेच अबकारी करामध्ये देखील सारखेपणा आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

सुब्रमण्यम म्हणाले, मला वाटतं की, २८ टक्क्यांची कररचना संपवायला हवी. अबकारी कर असायला हवा मात्र, यामध्ये समानता हवी. सध्या ४ टक्के, ५ टक्के, १२ टक्के आणि २८ टक्के अशी कररचना जीएसटीमध्ये आहे. यांपैकी वस्तूंच्या किंमती कमी करण्यासाठी सर्वांत आधी २८ टक्क्यांची कररचना संपवणे गरजेचे आहे.

अबकारी कर संपवावा का? या प्रश्नावर सुब्रमण्यम म्हणाले, अबकारी कराची गरज आहे मात्र, विविध प्रकारच्या वस्तूंसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कर नकोत. देशाच्या आर्थिक सल्लागरपदी असलेल्या व्यक्तीने या सूचना केल्याने त्या महत्वाच्या मानल्या जात आहेत.

अरविंद सुब्रमण्यम यांनी गेल्या आठवड्यात खासगी कारणांमुळे आपल्या मुख्य आर्थिक सल्लागर पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते आपल्या कुटुंबियांकडे अमेरिकेत परतणार आहेत. सुब्रमण्यम यांचा कार्यकाळ मे २०१९मध्ये संपणार होता मात्र, त्यापूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.