कर्नाटकच्या राज्यपालांनी भाजपाला सरकार स्थापन करण्यासाठी दिलेल्या आमंत्रणामुळे नाराज झालेल्या काँग्रेसने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. युडियुरप्पांचा शपथविधी रोखण्याची मागणी काँग्रेसने आपल्या याचिेकेद्वारे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्याकडे केली आहे. राज्यपालांचा निर्णय म्हणजे संविधानाचा अपमान असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेसच्यावतीने पक्षाचे नेते आणि वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले, मला अमित शहांना विचारायचे आहे की, निवडणुकीनंतर जर दोन पक्ष एकत्र येऊ शकत नसतील तर आपण मणिपूर आणि गोव्यामध्ये सरकार कसे स्थापन केले. याप्रकारामुळे राज्यापालांनी आपल्या पदाला लाज आणली आहे. कर्नाटकच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात आम्ही कायदेशीर आणि संविधानिक अधिकारांचा वापर करुन जनतेच्या कोर्टात जाणार आहोत.
तर जेडीएसचे कुमारस्वामी म्हणाले की, बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देऊन राज्यपालांनी भाजपाला आमदारांना खरेदीसाठी प्रोत्साहन दिले आहे. यामुळे मोठा घोडेबाजार होऊ शकतो. याविरोधात आम्ही पुढील रणनिती ठरवू.

कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला सरकार बनवण्यासाठी आमंत्रण दिले आहे. त्यामुळे भाजपाचे नेते बी. एस. येडियुरप्पा गुरुवारी सकाळी ९ वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्याचबरोबर राज्यपालांनी येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी दिला आहे.