लॉकडाउन हटवण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच शनिवारी(दि.5), तिरुपती बालाजी मंदिरात एका दिवसात 1 कोटींपेक्षा जास्त रुपये दान मिळाले आहेत. तिरुमाला तिरुपती देवस्थानमकडून (टीटीडी) ही माहिती देण्यात आलीॉ.

भारतातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेले तिरुमाला तिरुपती देवस्थान करोना व्हायरसच्या संकटामुळे 20 मार्चपासून बंद होते. 11 जूनपासून भाविकांसाठी मंदिर पुन्हा खुलं करण्यात आलं आहे.

मंदिर पुन्हा उघडल्यानंतर हुंडीमध्ये भाविकांनी एका दिवसात प्रथमच 1 कोटी रुपये दान दिले आहेत. ‘टीटीडी’ने रविवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनाद्वारे ही माहिती दिली. शनिवारी 13 हजार 486 भाविकांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

तिरुपती मंदिराला भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ओळखले जाते. सामान्यपणे दर महिन्याला रोख आणि हुंडीद्वारे सुमारे 200 कोटी रुपयांचे दान मिळत असते. देशातील सर्व मंदिरांच्या तुलनेत या मंदिराला सर्वाधिक रोख, दागिने आणि इतर देणग्या मिळतात.

करोना व्हायरसच्या संकटामुळे मंदिर 20 मार्चपासून बंद होते. 11 जूनपासून भाविकांसाठी मंदिर पुन्हा खुलं करण्यात आलं. त्यावेळी पहिले दोन दिवस फक्त टीटीडी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांसाठी मंदिर उघडण्यात आले होते. तर, तिसऱ्या दिवशी मंदिर स्थानिकांसाठी उघडण्यात आले होते. तेव्हा पहिल्याच दिवशी भाविकांनी 25 लाख 70 हजार रुपये दान केले होते. त्यानंतर आता लॉकडाउननंतर पहिल्यांदाच भाविकांनी मंदिरात भरभरुन दान केलं असून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपये दान दिले आहेत.