न्यूझीलंडमध्ये जॅसिंडा अर्डर्न यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर भारतीय वंशाच्या महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून प्रियांका राधाकृष्णन या न्यूझीलंडमधील भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री ठरल्या आहेत.

अर्डर्न यांनी त्यांच्या मंत्रिमंडळात पाच नवीन मंत्र्यांचा समावेश केला त्यात राधाकृष्णन यांचा समावेश आहे. भारतात जन्मलेल्या राधाकृष्णन ४१ वर्षांच्या असून सिंगापूरला शिकलेल्या आहेत. नंतरचे शिक्षण न्यूझीलंडमध्ये झाले. त्यांनी घरगुती हिंसाचाराने ग्रस्त महिला, छळ झालेले स्थलांतरित कामगार यांच्या वतीने आवाज उठवला. त्या संसदेवर मजूर पक्षाच्या वतीने सप्टेंबर २०१७ मध्ये निवडून आल्या.

२०१९ मध्ये त्यांची वांशिक समुदाय खात्याच्या मंत्र्यांच्या खासगी सचिव म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी राजकीय जम बसवून काम केले. आता सर्वसमावेशकता व विविधता, वांशिक अल्पसंख्याक विभागाच्या त्या मंत्री झाल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये त्या भारतीय वंशाच्या पहिल्या मंत्री आहेत.