News Flash

अॅम्ब्युलन्समध्ये लघुशंका करण्यासाठी ड्रायव्हरने पेशंटला काढलं बाहेर

माणुसकीला लाजवणारी कृती केली.

रस्ते अपघातात जखमी झालेला रुग्ण गाडीत असताना एका रुग्णवाहिकेच्या चालकाने माणुसकीला लाजवणारी कृती केली आहे. गाडीत लघुशंका करण्यासाठी म्हणून रुग्णवाहिकेच्या चालकाने अपघातग्रस्त रुग्णाची स्ट्रेचरच रुग्णवाहिकेबाहेर काढली. केरळच्या थ्रिसूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेचा व्हिडिओ काढला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये स्ट्रेचरचा अर्धा भाग रुग्णवाहिकेत आणि अर्धा भाग बाहेर दिसत आहे.

स्ट्रेचरवरील रुग्णाचे पाय रुग्णावाहिकेच्या आत तर डोके जमिनीच्या दिशेने दिसत आहे. स्ट्रेचरवरील रुग्णाचा २० मार्च रोजी पलक्कड जिल्ह्यात अपघात झाला होता. राष्ट्रीय महामार्गावर रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीने दिलेल्या धडकेत ती व्यक्ति जखमी झाली होती. जखमी व्यक्तिला आधी पलक्कड येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यानंतर अधिक चांगल्या उपचारासाठी त्या रुग्णाला थ्रिसूर येथील रुग्णालयात हलवण्यात येत असताना रात्री साडेआठच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.

पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कलम ३३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या रुग्णाचा नंतर मृत्यू झाला. या रुग्णाला थ्रिसूर येथे आणत असताना त्याच्यासोबत कोणीही कुटुंबिय नव्हते. पलक्कड रुग्णालयाचे कर्मचारी त्याच्यासोबत होते. रुग्णावाहिका रुग्णालयाच्या आवारात पोहोचल्यानंतर कर्मचारी ग्लोव्हज घेण्यासाठी काऊंटरच्या दिशेने धावले तितक्यात वाहन चालकाने स्ट्रेचर बाहेर काढून ठेवली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2018 7:37 pm

Web Title: for urinating in ambulance driver leaves patient upside down
टॅग : Kerala,Patient
Next Stories
1 लाजिरवाणं : … तर पीएनबी बँकेवरच कर्जबुडवी असा शिक्का बसेल!
2 ‘मुखी रामनाम आणि हातात हत्यार ही कोणती नीती आहे?’
3 ‘शमीसाठी देवाकडे प्रार्थना’, अपघातानंतर पत्नी हसीन जहाँने व्यक्त केली काळजी
Just Now!
X