‘फॉरबिडन स्टोरीज’ या संस्थेकडून प्रकरण उघडकीस

इस्राायलच्या ‘एनएसओ’ संस्थेने तयार केलेल्या पेगॅसस या स्पायवेअरचा वापर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्यासह सध्याच्या १४ राष्ट्रप्रमुखांवर पाळत ठेवण्यासाठी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. एनएसओ समूहाने तयार केलेले हे स्पायवेअर संबंधित व्यक्तीच्या मोबाइलमधील संभाषण, संदेश व इतर सगळी माहिती उघड करीत असते.

मॅक्रॉन यांच्यासह १४ जणांचे मोबाइल फोन हॅक करण्यात आले होते. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे सरचिटणीस अ‍ॅग्नेस कॉलामार्ड यांनी सांगितले, की ही अतिशय धक्कादायक बाब असून त्यामुळे जागतिक नेत्यांना धक्का बसला आहे. पन्नास हजार फोनमधील माहिती या स्पायवेअरच्या मदतीने उघड करण्यात आली आहे. पॅरिस येथील ‘फॉरबिडन स्टोरीज’ या संस्थेने हा प्रकार उघडकीस आणला असून त्यांनी म्हटले आहे, की दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामफोसा, इराकचे बरहाम सलिह, मोरोक्कोचे राजे महंमद-सहावे, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबोली, मोरोक्कोचे पंतप्रधान साद एडिन ओथमानी यांचाही यादीत समावेश आहे, असे ‘दी वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे. या राष्ट्रप्रमुखांनी त्यांचे मोेबाइल फोन तपासणीसाठी दिलेले नाहीत.

एनएसओचे पेगॅसस हे स्पायवेअर लष्करी दर्जाचे असून जागतिक माध्यम समूहाच्या १६ सदस्यांनी हा प्रकार उघड केला होता. २०१९ मध्ये मॅक्रॉन यांच्यासह मंत्रिमंडळातील पंधरा जण या स्पायवेअरच्या हिटलिस्टवर होते, असे ‘ल माँद’ या वृत्तपत्राने म्हटले आहे. पॅरिसच्या अभियोक्ता कार्यालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. अ‍ॅमेझॉन वेब सव्र्हिसेस या कंपनीने एनएसओला यात डिजिटल ओशनच्या माध्यमातून सव्र्हरची मदत केली होती. डिजिटल ओशन या कंपनीने आरोप फेटाळले किंवा स्वीकारलेले नाहीत, असे असोसिएटेड प्रेसने म्हटले आहे.