देशभरात करोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याच्या पाश्र्वाभूमीवर, दोन तासांहून कमी कालावधीच्या प्रवासासाठी विमानात जेवण देण्यास विमान कंपन्यांना मनाई करण्यात आलेली असल्याचे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने सोमवारी सांगितले. ही बंदी गुरुवारपासून अमलात येणार असल्याचे मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे.

गेल्यावर्षी करोनामुळे लागू केलेल्या टाळेबंदीनंतर देशांतर्गत हवाई वाहतूक २५ मे ला पुन्हा सुरू झाली, तेव्हा काही अटींच्या आधीन राहून विमानात जेवण पुरवण्यास मंत्रालयाने विमान कंपन्यांना परवानगी दिली होती.

‘देशांतर्गत मार्गांवरील उड्डाणाचा कालावधी दोन तास किंवा त्याहून अधिक असेल, तर संबंधित विमान कंपन्या विमानातील प्रवाशांना जेवण पुरवू शकतील’, असे मंत्रालयाने नव्या निर्देशांमध्ये म्हटले आहे.

‘कोविड-१९’ आणि त्याचे प्रकार यांची वाढती भीती लक्षात घेऊन विमानात पुरवल्या जाणाऱ्या भोजन सेवेचा आढावा घेण्याचे ठरवण्यात आले. दोन तासांहून अधिक कालावधीच्या प्रवासात विमान कंपन्यांना केवळ आधीच पॅक केलेले जेवण, नाश्ता आणि पेये पुरवण्याची परवानगी देण्यात आली आहे.