आपल्या देशातली वेगवान धावपटू असा जिचा लौकिक आहे त्या पी. टी. उषाने ३४ वर्षांनी आपल्या पराभवामागचे खरे कारण जनतेसमोर आणले आहे. लॉस एंजलिस या ठिकाणी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्याला जेवण दिले गेले ते हिणकस होते . भातासोबत लोणचे आणि लापशी असा आहार दिल्याने ती स्पर्धा मी हरले असे पी. टी. उषा यांनी सांगितले आहे. १९८४ मध्ये झालेल्या या स्पर्धेत सेकंदाच्या शंभराव्या भागाने त्यांचे कांस्य पदक हुकले होते. त्यामागचे कारण त्यांनी इतक्या वर्षांनी सांगितले आहे.

जे जेवण मला देण्यात येत होते त्याचा दर्जा चांगला नव्हता. ज्याचा परिणाम माझ्या धावण्यावर झाला असेही त्यांनी म्हटले आहे. १९८४ मध्ये झालेल्या या स्पर्धेत ४०० मीटर अंतर धावून कापत असताना पी. टी. उषा या रोमानियाच्या क्रिस्टियाना कोझोकारूसोबत तिसऱ्या क्रमांकावर धावत होत्या. मात्र शेवटच्या टप्प्यात त्या सेकंदाच्या १०० व्या भागाने मागे पडल्या आणि त्यांचे ब्राँझ पदक थोडक्यासाठी हुकले. यामागचे कारण सकस आहार मिळाला नव्हता हेच होते असेही उषा यांनी स्पष्ट केले. इक्वाटोर लाइनला दिलेल्या मुलाखतीत पी.टी. उषा यांनी ३४ वर्षांपूर्वी झालेल्या पराभवाचे कारण सांगितले.

त्यावेळी आम्ही जेव्हा दुसऱ्या देशाच्या खेळाडूंकडे पाहायचो तेव्हा आम्हाला त्यांचा मत्सर वाटत असे. त्यांच्याकडे ज्या सोयी सुविधा होत्या त्या आमच्याकडे नव्हत्या. एक दिवस आपल्यालाही अशा सोयी सुविधा आपल्याला मिळाल्या तर किती छान होईल असे आम्हाला तेव्हा वाटे असेही उषा यांनी सांगितले.

लॉस एंजलिसमध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा मला अर्धवट शिजवलेले चिकन खाण्यास सांगितले. मात्र ते मी खाऊ शकत नव्हते. अखेर आम्हाला लोणचे, भात आणि लापशी देण्यात आली. ज्याचा परिणाम माझ्या धावण्यावर झाला. ४०० मीटर धावत असताना शेवटच्या ३५ मीटरमध्ये माझ्यात त्राणच उरला नाही, त्यामुळे मी जोमाने धावू शकले नाही असेही पी.टी. उषा यांनी म्हटले आहे.