भारत आणि पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय सरहद्दीवर तसेच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उभय बाजूंनी जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. मंगळवार मध्यरात्रीपासून पाकिस्तानने केलेल्या माऱ्यात दोन महिला ठार तर १५ जखमी झाले. भारतानेही या माऱ्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलांना पूर्ण मोकळीक दिली असून त्यानुसार भारतीय सुरक्षा दलांनी केलेल्या माऱ्यात १५जण ठार तर ३०जण जखमी झाले आहेत. सीमेवरील परिस्थिती वेगाने पूर्ववत होईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
पाकिस्तानने मंगळवारी मध्यरात्रीपासून १९२ कि.मी.च्या सीमेवरील सीमा सुरक्षा दलाच्या ५० चौक्या आणि ३५ छावण्यांवर जोरदार मारा केला आहे. बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास साम्बा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सीमेवरील चिलारी गावाला पाकिस्तानने लक्ष्य केले. तेथे पाकिस्तानने केलेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात शकुंतला देवी आणि त्यांची सून पोलीदेवी या दोघी मृत्युमुखी पडल्याने मृतांची संख्या आठवर गेली आहे. या हल्ल्यात या दोघींचे पती तसेच पोलीदेवी यांची दोन्ही मुले जखमी झाली असून एकूण जखमींची संख्या ७१वर गेली आहे. यात बुधवारच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सीमा सुरक्षा दलाच्या तीन जवानांचाही समावेश आहे. या गावातील १७०० गावकऱ्यांनी गाव सोडले असून सुरक्षित जागी आसरा घेतला आहे. जोरदा भागात सकाळी नऊ वाजता झालेल्या माऱ्यात सहा गावकरी जखमी झाले. निवारा छावणीत रात्र काढून ते घरी परतत असताना हा मारा झाला.
भारतानेही सेनादलांना प्रत्युत्तर देण्यासाठी मुक्त वाव दिला असून जम्मूलगतच्या २०० कि.मी.च्या आंतरराष्ट्रीय हद्दीलगत पाकिस्तानी सीमा सुरक्षा दलाच्या ३७ चौक्यांवर भारतीय सुरक्षा दलांनी जोरदार भडिमार केला. यात अनेक चौक्या उद्ध्वस्त झाल्या असून १५जण ठार तर ३० जखमी झाले आहेत.  
सीमेपलीकडून होणारा गोळीबार आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन ही अत्यंत गंभीर बाब असून सरकारला त्यावर त्वरित तोडगा हवा आहे, असे हवाई दलप्रमुख अरूप राहा यांनी येथे स्पष्ट केले. हवाई दलाच्या ८२ व्या संचलन दिनानिमित्त ते वार्ताहरांशी बोलत होते.
अब्दुल्ला यांची चर्चा
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी जम्मूतील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बुधवारी प्रदीर्घ चर्चा केली. प्रशासनाने जम्मू, साम्बा आणि कथुआ जिल्ह्य़ात २४ निवारे उभारले असून त्यात सात हजार विस्थापितांना आश्रय देण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. या विस्थापितांना मोफत भोजन, औषधे, ब्लँकेट पुरविली जात आहेत.
हुरियतचे गोळीबार थांबविण्याचे आवाहन
हुरियत कॉन्फरन्समधील मवाळ गटाने भारत आणि पाकिस्तानने सीमेवरील गोळीबार तात्काळ थांबवावा, असे आवाहन केले आहे. निरपराध नागरिकांचा बळी जात असल्याने हा गोळीबार थांबवावा व उभय देशांतील तणावाचे मुख्य कारण असलेल्या काश्मीर प्रश्नावर चर्चेने तोडगा काढावा, असे आवाहन मिरवैझ उमर फारूक यांनी केले आहे.

सीमेवरील परिस्थिती वेगाने पूर्ववत होईल.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
पाकिस्तानविरोधात भारत इस्रायलसारखी भूमिका वठवू पाहात आहे. पण मोदींनी लक्षात ठेवावं की गुजरात दंगलीत तेथील जनता दबली तसे आम्ही दबणार नाही.
– बिलावल भुट्टो झरदारी