पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने डेरा सच्चा सौदा प्रकरणी देखरेख सुरू केली असून त्यासाठी न्याय दंडाधिकाऱ्यांची नेमणूक केल्यानंतरच प्रशासन सिरसा येथील डेऱ्याच्या मुख्यालयात घुसण्याची कारवाई करील, असे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी म्हटले आहे.

डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात घुसून कारवाई करण्यास प्रशासन का कचरत आहे, असे विचारले असता त्यांनी सांगितले, की उच्च न्यायालयाने न्याय दंडाधिकाऱ्यांची नेमणूक केल्यानंतरच आम्ही याबाबत विचार करू. आमची सुरक्षा दले स्वत:हून डेऱ्याच्या मुख्यालयात घुसणार नाहीत. उद्या तुम्ही लोक, स्वत:हून डेऱ्यात घुसून कारवाई केली असा दोषारोप करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. डेऱ्याचा परिसर ८०० एकरांचा आहे. न्याय दंडाधिकाऱ्यांची नेमणूक झाल्यानंतर त्याची तपासणी करण्यात येईल.

पंचकुलाचे रहिवासी रविंदर धुल यांनी याबाबत लोकहिताची याचिका दाखल करून प्रतिबंधात्मक आदेश असताना दीड लाख लोक या भागात घुसले, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असे म्हटले होते. डेराप्रमुख गुरमित राम रहीम सिंग याला बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर झालेल्या हिंसाचारात ३५ जण ठार झाले होते.

सिरसा येथील हिंसाचारात इतर सहा जण ठार झाले होते. राम-रहिम याला नंतर वीस वर्षे तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. डेरा सच्चा सौदाच्या समर्थकांना पंचकुला येथे जमण्यास संधी दिल्याचा आरोप हरयाणा सरकारवर करण्यात आला होता.

पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आम्ही उपाययोजना केल्या असा युक्तिवाद खट्टर यांनी केला आहे. सरकार सतर्क नसते तर यापेक्षा जास्त हिंसाचार झाला

असता. गुरमित राम रहीम सिंग याला न्यायालयात उपस्थित करताना २०१४ मध्ये रामपाल याच्या अटकेवेळी २०१४ मध्ये निर्माण झाली, तशी परिस्थिती निर्माण होऊ नये याला आम्ही प्राधान्य दिले होते.

‘डेरा’च्या अनुयायांकरवी बंदुकांसह शस्त्रे जमा

चंदिगड : डेरा सच्चा सौदाच्या सिरसा मुख्यालयातील अनुयायांनी डबल बॅरल व सिंगल बॅरल बंदुका व पिस्तुले यांच्यासह अनेक शस्त्रे जमा केली असल्याचे हरयाणा पोलिसांनी सोमवारी सांगितले.

तीसहून अधिक रायफली व पिस्तुले तसेच त्यांची जिवंत काडतुसे सिरसा जिल्हा पोलिसांकडे जमा करण्यात आली आहेत. सिंगल बॅरल व डबल बॅरल बंदुका व ९ मिमीची पिस्तुले मिळून एकूण ३३ परवानाप्राप्त शस्त्रे डेरा अनुयायांनी जमा केली असल्याचे सिरसा दर पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिनेश कुमार यांनी सांगितले.

डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांनी त्यांच्याजवळील शस्त्रे व दारूगोळा पोलिसांकडे सोपवण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी केल्यानंतर त्यांनी ही परवानाप्राप्त शस्त्रे जमा केली आहेत.

पंचकुला येथील सीबीआयच्या एका विशेष न्यायालयाने डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम याला बलात्काराच्या प्रकरणात गेल्या २८ ऑगस्टला २० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली होती.